जळगाव जिल्ह्यात केलेली चार विकास कामे दाखवा! मतदारांनी विचारला रक्षा खडसेंना जाब

जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यातील कोचूर या गावी प्रचाराला आलेल्या भाजप उमेदवार रक्षा खडसे यांना स्थानिकांनी घेरलं आणि प्रश्न विचारत विरोध केला. आपण जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत किती विकासकामं केली, असा प्रश्नही मतदारांनी उपस्थित केला.

जळगाव जिल्ह्यातल्या रावेर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून रक्षा खडसे या उमेदवार म्हणून उभ्या आहेत. गेल्या दोन निवडणुकांवेळी खडसे यांना पाठिंबा देणारे जळगावकर यावेळी नाराज असल्याचं चित्र दिसत आहे. त्याचा प्रत्यय व्हायरल व्हिडीओतून आला आहे.

सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात रक्षा खडसे यांना ग्रामस्थांनी विकास कामांविषयी प्रश्न विचारल्याचं दिसून आलं आहे. रावेर मतदारसंघातील कोचूर या गावात प्रचारासाठी आलेल्या रक्षा खडसेंना स्थानिकांनी कोणती चार विकासकामे केली, असा प्रश्न विचारला. त्यावर खडसेंनी उत्तर देण्याऐवजी त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी मतदारांना थांबवण्याचा प्रयत्न केला.

मतदारांचा राग पाहून रक्षा खडसे तिथून लगबगीने निघाल्या आणि गाडीत जाऊन बसल्या. मात्र, तोपर्यंत ग्रामस्थांनी त्यांना चार विकासकामं दाखवा, किमान कोणती केली ते सांगा, असं म्हटलं. त्यावर उत्तर न देता त्या तिथून जायच्या तयारीत दिसल्या. हा व्हिडीओ व्हायरल होत असून हीच का मोदींची गॅरंटी असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.