नवरात्रीसाठी दुर्गादेवीची मूर्ती आणायला गेलेल्या तरुणांवर काळाचा घाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू, 12 जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमरावती जिह्याच्या धामणगावमध्ये समृद्धी महामार्गावर गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. नवरात्रोत्सवासाठी दुर्गादेवीची मूर्ती आणायला गेलेल्या तरुणांवर काळाने झडप घातली. या दुर्दैवी अपघातात सात जणांचा मृत्यू तर 12 जण जखमी झाले. नवरात्रोत्सवाच्या तोंडावर घडलेल्या या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

धामणगाव पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या समृद्धी महामार्गावर मध्यरात्री एकच्या सुमारास टाटाएस गाडीचा भीषण अपघात झाला. शेगाव येथून दुर्गादेवीची उंच मूर्ती नवरात्रोत्सवासाठी आणली जात असताना दुर्गामाता मंडळातील तरुण सदस्यांचा हा भीषण अपघात झाला. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 12 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून हे सर्वजणस वर्ध्याच्या सिंदी मेघे परिसरात राहणारे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गाने बोलेरो पीकअप गाडीने शेगाव येथून मूर्ती आणली जात होती. दरम्यान धामणगावजवळ रात्रीच्या सुमारास बोलेरो गाडीला पंटेनरने मागून धडक दिली. परिणामी मूर्ती असलेली बोलेरोची पीकअप गाडीला जोरदार धडक बसली. तर मूर्तीसोबत चालणारे मंडळाचे सदस्य या अपघातात चिरडले गेले.

शेगावहून मूर्ती आणताना घडली दुर्दैवी घटना

दरवर्षी सिंदी मेघे येथील दुर्गामाता मंडळाचे सदस्य देवीची मूर्ती शेगाव येथून आणतात. यावेळीदेखील शेगाव येथून मूर्ती आणण्याकरिता हे मंडळ शेगाव येथे गेले होते. शेगाव येथून समृद्धी महामार्गाने मूर्ती घेऊन परत येत असताना ही दुर्दैवी घटना घडली. रोडवर मूर्तीसह तरुण कार्यकर्ते चालत असताना दुसऱया वाहनाने दिलेल्या धडकेत 7 जणांचा मृत्यू झाला. या घटनेने सिंदी मेघे परिसरात शोक पसरला असून मंडळातील सदस्यांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

जखमींवर सावंगी रुग्णालयात उपचार सुरू

जखमींना वर्ध्याच्या सावंगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात 12 गंभीर जखमी, तर पाच किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.