भीषण दुष्काळाच्या खाईत आष्टीचा राजकीय आखाडा तापला, सत्तेतील मित्रपक्षात जुंपली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या कोणत्याही निवडणुका डोळ्यासमोर नसताना आष्टी मतदार संघाचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दुष्काळी मोर्चातून माजी आमदार तथा सत्ताधारी अजित पवार गटाचे बाळासाहेब आजबे आणि भाजपा आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. दुष्काळातच सत्ताधार्‍यांमध्ये राजकारण पेटल्यामुळे शेतकरी मात्र डोक्याला हात लावत आहे.

दुष्काळाची धग अधिक तिव्र होत असताना सत्तेतील मित्र पक्षामध्ये वाद पेटला आहे. आष्टीचे अजित पवार गटाचे माजी आमदार बाळासाहेब आजबे व भाजपाचे विद्यमान आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यामध्ये आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. दुष्काळी मोर्चामध्ये बाळासाहेब आजबे यांनी साहेब मॅडमला आवरा, असे म्हणत विविध देवस्थानच्या जमिनी हडप केल्याचा आरोप आमदार धस व प्राजक्ता धस यांच्यावर नाव न घेता केला होता. यावर प्राजक्ता धस यांनी बाळसाहेब आजबे यांच्या वडिलांचे नाव घेत भाऊसाहेब आजबे यांचे वारस असाल तर पुरावे द्या असे म्हटले होते, यावर आजबेंनी मी खरा वारस असून जमिनी अपहाराचे पुरावे सादर करत मी काही कोणाचा हात धरुन बाजारातून अथवा जत्रेतून आलो नाही असे उत्तर दिल्याने राजकारण तापले आहे. तर प्राजक्ता धस यांनी देखील कोणत्याही महिलेचा अवमान कराल तर मी सहन करणार नाही, दुष्काळी मोर्चामध्ये माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाला असा आरोप देखील त्यांनी केला आहे.