संदीप क्षीरसागरांची भावनिक पोस्ट, काकू, मला माफ करा म्हणत व्यक्त केली खंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आपल्या फेसबुक पेजवरून शनिवारी दुपारी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. जिल्ह्याच्या लोकनेत्या आणि त्यांच्या आजी स्व.केशरकाकू क्षीरसागर यांच्या फोटोसह शेअर केलेल्या पोस्टमध्ये ‘काकू मला माफ करा’, असे म्हणत आमदार संदीप क्षीरसागर यांनी मनातील खंत सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. ही पोस्ट आणि त्यातील भावना चर्चेचा विषय ठरली आहे.

संदीप क्षीरसागर यांनी आपल्या फेसबुक पेजवरून काकू मला माफ करा या टॅगलाईनखाली म्हटले आहे की, स्व.काकूंच्या पुण्यतिथीनिमित्त राजकारण विरहित कुटुंब एकत्र येणार म्हणून आनंद होताच, सामाजिक एकोपा बिघडवणार्‍या एका व्यक्तीचे नाव कार्यक्रम पत्रिकेत वाचले आणि कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला. नेहमीप्रमाणे स्व.काकूंना अभिवादन करण्यासाठी तर जाणारच पण लोकभावना पायदळी तुडवून कार्यक्रमास मात्र येवू शकत नाही, काकू मला माफ करा अशा भावना त्यांनी पोस्टच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. दरम्यान संदीप क्षीरसागर यांच्या फेसबुक पोस्टमुळे मोठी खळबळ उडाली आहे. कारण आपल्या आजीच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी त्यांना निमंत्रित केलेल्या पत्रिकेवरील कोणते नाव अपेक्षित नव्हते याबाबत जनमाणसात तर्क-वितर्क लावले जात आहेत.