लोकसभा आणि विधानसभा बरखास्त करा, सध्याच्या सर्व निवडणुका अवैध; ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर नव्याने मतदान घ्या – मल्लिकार्जुन खरगे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी कर्नाटकच्या कलबुर्गी येथे निवडणूक प्रक्रियेवर अत्यंत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला. सध्याच्या निवडणुका पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे सांगत त्यांनी लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभा तत्काळ बरखास्त करून ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर नव्याने निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. देशातील मतदान प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात असून, याविरोधात इंडिया आघाडीच्या माध्यमातून देशव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मल्लिकार्जुन खरगे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका मांडली. आज संपूर्ण देश बेकायदेशीर निवडणुकांच्या आधारावर चालत असल्याचा दावा करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बेकायदेशीर पंतप्रधान असून अमित शहा हे बेकायदेशीर मंत्री आहेत, असे विधान त्यांनी केले. तसेच देशभरात निवडून आलेले सर्व राज्यांचे मुख्यमंत्रीही बेकायदेशीर असल्याचे ते म्हणाले. या सर्व सरकारांना बरखास्त करून नव्याने केवळ बॅलेट पेपरवर निवडणुका व्हायला हव्यात, यावर त्यांनी भर दिला. ईव्हीएमचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत असल्याचा आरोप करत, खुद्द सत्ताधाऱ्यांचे लोकच असे बोलत असल्याचे खरगे म्हणाले.

मतदार याद्यांच्या सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेतही मोठ्या प्रमाणावर गडबड असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. सरकारच्या या चुकीच्या प्रक्रियेमुळे लोकशाही कमकुवत होत असून याचा सर्वाधिक फटका गरीब, मजूर, कमी शिकलेले लोक आणि अल्पसंख्याक समाजाला बसत असल्याचे खरगे म्हणाले. या गंभीर त्रुटी आणि ईव्हीएमच्या गैरवापराविरोधात विरोधी पक्ष गप्प बसणार नसून इंडिया आघाडीच्या माध्यमातून याविरोधात आवाज उठवला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ३० सप्टेंबर रोजी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीचा संदर्भ देत ते म्हणाले की, या मुद्द्यावर संयुक्त आंदोलन करण्याचा निर्णय विरोधकांनी घेतला आहे. त्यानुसार २ ते ८ ऑक्टोबर दरम्यान लोकशाही वाचवा (Save Democracy) अभियान राबवले जाणार असून, ६ ऑक्टोबर रोजी सर्व विरोधी पक्षांचे खासदार निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.