
कर्नाटकचे मंत्री आणि काँग्रेस नेते प्रियांक खरगे यांनी शनिवारी भाजपवर आणि निवडणूक आयोगावर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयोगाची भेट घेण्यावर भाजपने आक्षेप घेतल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. “भाजप हा निवडणूक आयोग किंवा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा प्रवक्ता असल्यासारखा का वागतोय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, खरगे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि भाजपच्या भूमिकेवर अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित केली आहेत.
काँग्रेसचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटायला गेल्यावर भाजपला त्यातून अडचण का वाटत आहे? निवडणूक आयोगाशी संबंधित प्रश्नांना उत्तरे देण्याचे काम आयोगाचे आहे, पण त्याऐवजी भाजपच का प्रत्येक प्रश्नाला उत्तरे देत आहे, असा सवाल खरगे यांनी केला.
“तुम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला तर भाजप उत्तर देतो, आरएसएसला प्रश्न विचारला तर भाजप उत्तर देतो. भाजप स्वतःच्या पक्षाव्यतिरिक्त इतर सर्वांच्या प्रश्नांना उत्तरे का देतो? हे विचित्र नाही का?” असेही खरगे म्हणाले.



























































