गामा पैलवानासह सातजणांना जन्मठेपेची शिक्षा

सोलापुरात गाजलेल्या आबा कांबळे खून खटल्यातील सात आरोपींना जिल्हा न्यायाधीश एस. आर. शिंदे यांनी जन्मठेपेची शिक्षा व दंड ठोठावला.

सुरेश ऊर्फ गामा अभिमन्यू भोसले (वय 74, रा. द. कसबा पाणीवेस) 2) रविराज दत्तात्रय शिंदे (शाहीरवस्ती), अभिजीत ऊर्फ गणेश चंद्रशेखर शिंदे (निराळेवस्ती), प्रशांत ऊर्फ अप्पा पांडुरंग शिंदे (द. कसबा पाणीवेस), नीलेश प्रकाश महामुनी (रोळगी), तौसिफ गुडूलाल विजापुरे (द. कसबा पाणीवेस), विनीत ऊर्फ ईश्वर भालचंद्र खाणुरे (द. कसबा पाणीवेस) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. ‘खून का बदला खून’ या वैमनस्यातून 2018 मध्ये आबा कांबळे यांचा खून करण्यात आला होता.

या गाजलेल्या खटल्याची हकिकत अशी, सन 2004 मध्ये सुरेश ऊर्फ गामा अभिमन्यू शिंदे यांचा मुलगा ऋतुराज शिंदे याचा खून आबा ऊर्फ सत्यवान कांबळे (रा. उत्तर कसबा) व त्याच्या साथीदारांनी घडवून आणला होता. या घटनेपासून वैमनस्य वाढले होते. मुलाच्या खुनाचा बदला घेण्याच्या उद्देशाने घटनेच्या दिवशी रात्रीच्या सुमारास मोबाईल गल्लीमध्ये आबा कांबळे मित्राबरोबर बोलत थांबलेला असताना  गामा पैलवान ऊर्फ सुरेश अभिमन्यू शिंदे याच्यासह रविराज दत्तात्रय शिंदे, अभिजीत ऊर्फ गणेश चंद्रशेखर शिंदे, प्रशांत ऊर्फ आप्पा पांडुरंग शिंदे, नीलेश प्रकाश महामुनी, तौसिफ गुडूलाल विजापुरे, नितीन ऊर्फ ईश्वर भालचंद्र खानोरे यांनी कोयत्याने वार करून खून केला होता. आबा कांबळेच्या शरीरावर 58 वार करण्यात आले होते. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खुनाचा तपास सहायक पोलीस आयुक्त डॉ. दीपाली काळे यांनी केला. या खटल्यात 28 साक्षीदार तपासण्यात आले, तर आरोपींकडून 8 कोयते व 6 मोबाईल जप्त करण्यात आले होते.

न्यायालयाने सर्व आरोपींना दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी सतरा हजार रुपये दंड ठोठावला आहे. यात सरकार पक्षातर्फे ऍड. प्रदीपसिंग रजपूत, तर आरोपीच्या वतीने ऍड. प्रशांत नवगिरे, ऍड. श्रीकांत जाधव, ऍड. शशी कुलकर्णी, ऍड. झुरळे यांनी काम पाहिले. आबा कांबळे हा पत्रातालीम परिसरात राहणारा तरुण 2004 मध्ये पाणीवेस तालीम परिसरात राहणाऱया ऋतुराज शिंदे यांच्या खून प्रकरणातील प्रमुख आरोपी होता. त्यानंतर तब्बल 14 वर्षांनंतर आबा कांबळे याचा खून करून बदला घेण्यात आला.