
शास्त्रीनगर रुग्णालयातील महिला तसेच पुरुष डॉक्टर आणि परिचारिकांवर हल्ला करून त्यांना बेदम मारहाण करणारे शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह त्यांच्या तीन गुंड कार्यकर्त्यांची 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी कल्याण न्यायालयातील न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायाधीश श्रीमती के. एस. कातकडे यांच्या दालनात झाली.
रमेश म्हात्रे आजारी असल्याचा दावा करत त्यांचे वकील अॅड. अजित पत्की यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घ्यावी यासाठी गुरुवारी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळत प्रत्यक्ष कोर्टात हजर करा, असे आदेशच दिले होते. त्यामुळे म्हात्रे यांना ठाणे सिव्हील रुग्णालयातून पोलीस व्हॅनमधून आज दुपारी अडीच वाजता कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे सी.व्ही. बावस्कर आणि ए.पी. आडसकर यांनी तर आरोपींच्या वतीने अॅड. अजित पत्की यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून न्यायालयाने रमेश म्हात्रे, रमेश पवार, प्रमोद उर्फ प्रकाश निकम आणि अक्षय कारंडे या चौघांनाही 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्याचा आदेश दिला.






























































