‘स्पेन’टास्टिक, महिला फुटबॉलला लाभले नवे जगज्जेते, इंग्लंडचा पराभव करत स्पेनने मारली बाजी

स्पेनच्या महिलांनी फिफा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये फॅण्टास्टिक कामगिरी करत प्रथमच जगज्जेती होण्याचा पराक्रम केला. स्पेन आणि इंग्लंड हे दोन्ही संघ पहिल्यांदाच अंतिम फेरी खेळत असल्यामुळे महिला फुटबॉलला नवे जगज्जेते लाभणार हे निश्चित होते आणि स्पेनला फायनलमध्ये पोहोचविणाऱया ओल्गा कारमोनाने आपल्या एकमेव गोलाच्या जोरावर आपल्या पहिल्या जगज्जेतेपदावरही शिक्कामोर्तब केले.
स्पेन आणि इंग्लंड यांच्यात जोरदार लढत सुरू झाली. इंग्लंडच्या खेळाडूंनी स्पॅनिश गोलपोस्टवर हल्ले चढवायला सुरुवात केली, पण एकही गोल होऊ शकला नाही. पहिल्या 20 मिनिटांत स्पेननेही इंग्लंडला चोख प्रत्युत्तर दिले. त्यातच 29 व्या मिनिटाला ओल्गा कारमोनाने गोल करून स्पॅनिश संघात चैतन्य निर्माण केले. त्यानंतर इंग्लडने बरोबरी साधण्यासाठी धडपड केली, पण हाफटाइमपर्यंत ते पिछाडीवर राहिले.
उत्तरार्धातही इंग्लंडने गोलचे खाते उघडण्यासाठी आपले सर्वोत्तम प्रयत्न केले. कधी इंग्लंड तर कधी स्पेन गोलपोस्टवर हल्ला चढवत होता, पण यश कुणालाच लाभले नाही. 64 व्या मिनिटाला इंग्लंडच्या वॉल्शकडून फाऊल झाला. बॉल तिच्या हाताला लागला आणि रेफ्रींनी स्पेनला पेनल्टी दिली. स्पेनच्या हरमोसोने पेनल्टी किक मारली, परंतु इंग्लंडच्या गोलकिपर अर्प्सने स्पेनला दुसरा गोल करू दिला नाही. यानंतर इंग्लंडने शेवटपर्यंत बरोबरीसाठी संघर्ष केला, पण ते बरोबरी साधू शकले नाही आणि स्पेनच्या महिला फुटबॉलच्या नव्या जगज्जेत्या झाल्या.
विक्रम एके विक्रम 
– स्पेन अमेरिका (4), जर्मनी (2), नॉर्वे आणि जपाननंतर महिला फिफा वर्ल्ड कप जिंकणारी पाचवी टीम ठरली. स्पेनच्या पुरुष संघानेही 2010 साली फिफा वर्ल्ड कप जिंकला आहे. त्याचप्रमाणे फिफाचे दोन्ही वर्ल्ड कप जिंकणारा स्पेन हा दुसराच देश ठरला आहे. याआधी केवळ जर्मनीच्या दोन्ही संघांनी हा पराक्रम दोनदा केला आहे.
– इंग्लंड संघाने पहिल्यांदा अंतिम फेरी गाठली असली तरी ते 2015 मध्ये उपांत्य फेरीत पोहोचले होते. तेव्हा ते कांस्य पदकाचे मानकरी ठरले होते तर आता त्यांनी रौप्य लाभले.
– स्पेनने या स्पर्धेपूर्वी वर्ल्ड कपमध्ये केवळ एकच सामना जिंकला होता आणि आता त्यांनी थेट जगज्जेतेपदावर कब्जा केला.
– स्पेनचा संघ पहिल्या सहाही स्पर्धांमध्ये पात्र ठरली नव्हती. 2015 साली सर्वप्रथम त्यांचा संघ पात्र ठरला.  ते तीनपैकी दोन सामन्यांत हरले आणि एक सामना ड्रॉ राहिला. त्यामुळे साखळीतच बाद झाले होते.
– 2019 साली ते पुन्हा खेळले. यावेळी त्यांनी एका विजयासह राऊंड 16 मध्ये स्थान मिळविले, पण ते त्यात हरले. या एका विजयानंतर पुन्हा त्यांचा संघ वर्ल्ड कप खेळला आणि थेट जगज्जेते ठरले.
– यंदा ते सातपैकी सहा सामने जिंकले. त्यांना साखळीत एका सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते.
– स्पेन वर्ल्ड कप जिंकणारा तिसरा युरोपियन देश ठरला. तसेच 9 स्पर्धांपैकी 4 स्पर्धा युरोपियन संघांनी जिंकल्या आहेत. 4 अमेरिकेने तर 1 आशियाई देश जपानने जिंकली आहे.
– स्पेनने या सात सामन्यांत सर्वाधिक 18 गोल ठोकले आणि त्यांना सात गोल झेलावे लागले.
– स्पेनची ओल्गा कारमोना उपांत्य आणि अंतिम फेरीत गोल ठोकणारी दुसरी खेळाडू ठरली. 2015 मध्ये अमेरिकेच्या कार्ली लॉयडने हा पराक्रम केला होता. या स्पर्धेआधी कारमोनाच्या नावावर केवळ एक आंतरराष्ट्रीय गोल होता. आता तो आकडा तीनवर पोहोचला आहे.