पिगिंगचे काम सुरू दुर्घटना असताना जेएनपीएच्या लिक्विड जेट्टीवर अपघात, दोन कामगार ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जेएनपीएच्या लिक्विड जेट्टीवर रविवारी सकाळी भीषण अपघात घडला. जेएसडब्ल्यू कंपनीच्या जेट्टीवर १० इंचाच्या पाइपलाइनमध्ये पिगिंगचे काम सुरू असताना ही दुर्घटना झाली. या अपघातात गणेश बॅन्जो प्लास्ट कंपनीचा लोडिंग ऑफिसर राजेंद्र शिंदे (३२) व खासगी कंपनीचे जगन्नाथ गावंड (५४) हे दोघे कामगार जागीच ठार झाले. या भीषण अपघातानंतर रासायनिक कंपन्यांच्या कामगारांची जीवाच्या आकांताने अक्षरशः पळापळ झाली.

रविवारी सकाळी ९ ते ९.३० वाजताच्या दरम्यान जेएसडब्ल्यू या कंपनीच्या जेट्टीवर असलेल्या दहा इंच व्यासाच्या पाइपलाइनमध्ये देखभाल, तपासणी, साफसफाई करण्यासाठी पिगिंगचे काम सुरू होते. स्क्रॅपर हे उपकरण पाइपलाइनमधून आत पाठवले जाते. मात्र स्क्रॅपर पाइपलाइनमधून अत्यंत वेगाने बाहेर येऊन कामगारांवर आदळले. या भीषण अपघातात राजेंद्र शिंदे व जगन्नाथ गावंड हे दोघे कामगार जागीच ठार झाले.

  • अपघातानंतर दोन्ही कामगारांना उपचारासाठी जेएनपीएच्या इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनासाठी दोन्ही मृतदेह उरण येथील शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहेत.
  • अपघात निष्काळजीपणामुळे की अन्य कारणांमुळे झाला याचा उलगडा तपासानंतर होणार असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे यांनी दिली.
  • कंपनी अधिकारी, कंत्राटदार यांच्यात आर्थिक नुकसानीवर चर्चा झाली. मात्र याबाबत सविस्तर माहिती वरिष्ठ अधिकारीच देऊ शकतील, असे जीबीएल कंपनीच्या व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.

लिक्विड कार्गो जेट्टीवर चालते हे काम

जेएनपीएची चार जहाजांची क्षमता असलेली दुहेरी बर्थ लिक्विड कार्गो जेट्टी आहे. वार्षिक ७.२ दशलक्ष टन तरल पदार्थ हाताळणी क्षमतेच्या दोन्ही जेट्टींपैकी एक शेट्टी बीपीसीएल कंपनीला तर नव्याने उभारण्यात आलेली लिक्विड जेट्टी जेएसडब्लू या कंपनीला भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. या लिक्विड जेट्टीवरून पीओएल उत्पादने, खाद्यतेल, रसायने, आम्ल इत्यादी विविध प्रकारच्या मालाच्या हाताळणीसाठी टँक फार्ममधून ८ इंच ते ३० इंच व्यासाच्या २३ वेगवेगळ्या आकारांच्या पाइपलाइन जेट्टीला जोडलेल्या आहेत. या पाइपलाइनमधूनच क्रूड ऑइल, तेल, विविध रसायने परिसरातील विविध रासायनिक हाताळणी करणाऱ्या कंपन्यांनामध्ये पाठवण्यात येते.