आपटा स्मशानात ओम फट् स्वाहा; नारळ, लिंबू, दोरे गुंडाळलेली वांगी, खांबावर काळे धागे, जादूटोणाच्या भीतीने गावकऱ्यांमध्ये दहशत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रसायनी परिसरातील आपटा गावच्या स्मशानभूमीतील अंत्यसंस्काराच्या शेडमध्ये नारळ, लिंबू, विविध रंगांची दोरे गुंडाळलेली वांगी आणि शेडच्या चारही खांबांना काळ्या रंगाचे धागे बांधल्याचे उघडकीस आले आहे. ओम फट् स्वाहाचा हा प्रकार उघडकीस आल्यामुळे गावकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. स्मशानभूमीत जादूटोणा करणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

आपटा गावातील नदीकिनारी असलेल्या स्मशानभूमीत काही नागरिक गेले असता त्यांना हा धक्कादायक प्रकार दिसून आला. स्मशानभूमीत ज्या शेडखाली मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात, त्या ठिकाणच्या चारही खांबांना काळा दोरा बांधण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर तिथे नारळ, लिंबू आणि अनेक दोरे गुंडाळलेली वांगी ठेवण्यात आली आहेत. हा भाणामतीचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर अघोरी प्रकार नेमका कुणी आणि कोणत्या उद्देशाने केला, याचा शोध घेणे अत्यंत गरजेचे आहे. या घटनेची पोलिसांनी आणि ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ने तातडीने गंभीर दखल घ्यावी. स्मशानभूमीत जाऊन असे कृत्य करणाऱ्या अज्ञाताचा शोध घेऊन त्याच्यावर ‘जादूटोणाविरोधी कायद्या’अंतर्गत कडक कारवाई करावी, अशी मागणी आपटा गावातील नागरिकांकडून केली जात आहे.

आघोरी विद्याचे प्रकार वाढले

कर्जत तालुक्यातील एका गावात स्मशानभूमी मांत्रिक आघोरी विद्याचा वापर करून जादूटोणा करत असल्याचा प्रकार गेल्या काही महिन्यांपूर्वी घडला होता. त्यानंतर आपटा गावातील स्मशानभूमीत ओम फट् स्वाहाचा हा प्रकार उघडकीस आला आहे. स्मशानभूमीत आघोरी विद्येचे प्रकार वाढल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. स्मशानभूमीत असे भयानक प्रकार घडू लागल्याने ग्रामस्थांवर एक प्रकारचे दडपण निर्माण झाले आहे.