इमाम, मौलवींच्या किमती ऐवजांची चोरी

मशिदीमध्ये पहाटे पाच वाजताची फजरची नमाज झाल्यानंतर आराम करणाऱ्या इमाम व मौलाना  यांचे मोबाइल, पैसे चोरी करणारा एक सराईत चोरटा गुन्हे शाखेच्या हाती लागला आहे. मूळचा यूपीचा असलेल्या या चोराने अशा प्रकारे मुंबई, पुणे, कानपूर आदी ठिकाणच्या मशिदीत जाऊन चोऱ्या केल्याचे समोर आले आहे.

धारावी परिसरातील चार वेगवेगळय़ा ठिकाणच्या मशिदीत पहाटे पाचच्या फजरनंतर आराम करणाऱ्या इमाम, मौलाना यांचे मोबाइल व पैसे चोरीला गेल्याच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर युनिट-5चे प्रभारी निरीक्षक घनशाम नायर, निरीक्षक सदानंद येरेकर, सपोनि अमोल माळी, अंकुश न्यायनिर्गुणे व पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पहाटेच्या वेळेस मशिदीमध्ये नमाजाच्या बहाण्याने जाऊन चोरी करणारा चोरटा अझीम मोहम्मद आलम शेख हा सीएसएमटी स्थानक परिसरात असल्याची माहिती मिळताच पथकाने तेथे जाऊन त्या 29 वर्षीय आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून चोरीचे सात मोबाइल हस्तगत करून पाच गुह्यांची उकल करण्यात आली.