दुचाकी चोरटय़ांकडून दहा गुह्यांची उकल

शहरातील विविध भागांतील दुचाकी चोरणाऱया दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून शहरातील दहा गुन्हे उघडकीस आले असून, 5 लाख 60 हजारांच्या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

निखील महेश मागाडे (वय 24, रा. रजपूत मळा, अभयनगर) आणि आयान समीर भिस्ती (वय 30, रा. जुना कुपवाड रस्ता, सटालेमळा, राजीवनगर,) अटक केलेल्या सराईत चोरटय़ांची आहेत.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास बुधवारी (दि. 10) चिन्मय पार्कनजीक दोघेजण विनानंबरची दुचाकी विक्री करण्यासाठी आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दोघांना पळण्याची संधी न देता ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, संशयित निखिल मागाडे याने, आयान भिस्ती आणि शाहिद समीर मुल्ला (दोघेही रा. राजीवनगर) यांच्यासमवेत दुचाकी चोरल्याची कबुली दिली. चोरीच्या दुचाकी सह्याद्रीनगर परिसरातील सांगली रेल्वे स्टेशनच्या गोडावूनच्या मोकळ्या जागेत लावल्याचे सांगितले. पोलिसांनी गोडावूनमधून दहा दुचाकी हस्तगत केल्या.

अटक करण्यात आलेल्या दोघा चोरटय़ांवर दुचाकी चोरीचे गुन्हे असल्याची कबुली दिली. तपास मिरज शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि राजेश माने, पोलीस कर्मचारी अनिल ऐनापुरे, अमर नरळे, सचिन धोत्रे, विनायक सुतार, अजित पाटील आदींनी सहभाग घेतला.