सेक्स स्कँडल करणाऱ्यांची घराणेशाही मोदींना चालते, उद्धव ठाकरेंचा घणाघात

सेक्स स्कँडल प्रकरणात अडकलेल्या प्रज्ज्वल रेवन्ना याला मत द्या म्हणजे माझे हात बळकट होतील असं मोदी म्हणाले होते. मोदींना सेक्स स्कँडल करणाऱ्यांची घराणेशाही चालते पण शिवसेनेची नाही, असा जोरदार घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. सोलापूर येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले की, बऱ्याच दिवसांनंतर मी सोलापूरमध्ये आलोय. आजपर्यंत जेव्हा कधी आलो तेव्हा मी कोणासाठी आलो ते तुम्हाला माहितीये. आज जे आलोय ते त्यांना गाडा सांगायला आलो आहे. शिंदेसाहेबांनी बाळासाहेबांची आठवण काढली. दोघंही एकमेकांचे चांगले मित्र. या दोघांनी राजकारण आणि मैत्री यांची भेसळ होऊ दिली नाही. मतभिन्नता न लपवता मांडली आणि मैत्रीही जपली. हल्ली कुणाला मित्र म्हणायचं तर पाठ सांभाळावी लागते. कारण हल्लीचे मित्र हे पाठीत वार करणारे आहेत. तुमच्याकडे भाकड जनता पक्षाचे नेते होऊन गेले. शिवसेनाप्रमुख त्यांना कमळाबाई म्हणायचे. कमळाबाईचे एक नेते नरेंद्र मोदी येऊन गेले. सध्या सगळीकडे ते फिरताहेत आणि लोकांच्या कोपराला गूळ लावताहेत. कोपराला गूळ लागला की कसं होतं, धड चाटता पण येत नाही आणि गूळ आहे म्हणून काढता पण येत नाही. 2014ला 2019चा गूळ लावला होता, 2019ला 2024चा आणि आता थेट 2047. शिवसेनेला आज ते नकली सेना म्हणाले. पण उद्या मोदी धाराशिवला म्हणजे त्यांच्यालेखी उस्मानाबादला येताहेत. कारण आपण नामांतर केलं. त्यांनी केलं नाही. माझी जाहीर मागणी आहे की, उद्या भवानी मातेच्या मंदिरात दर्शन घेऊन या. आजपर्यंत तुम्ही कधी भवानी मातेचं दर्शन घेतलेलं नाही. आणि दर्शन घेऊन तुमच्या भाषण लिहिणाऱ्याने जे लिहून दिलं असेल ते भवानी मातेचं कौतुक तरी करा. जर तुम्ही बोलला नाहीत, तर तुमच्या मनात महाराष्ट्राबद्दल, भवानी मातेबद्दल आकस आहे, हे जनतेला समजेल. आणि तुम्ही जर बोललात तर तुमचा नोकर असलेल्या निवडणूक आयोगाने आमच्या शिवसेना गीतातल्या जय भवानी या शब्दांवर जो आक्षेप घेतलाय, त्याला म्हणावं घरगड्या आक्षेप बाजूला काढ. जर गुन्हा दाखल होणार असेल तर उद्धव ठाकरेंसह नरेंद्र मोदींवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. आता तुम्ही जय भवानी म्हणा किंवा नका म्हणू, महाराष्ट्र वाट बघतोय, असा जोरदार टोला त्यांनी हाणला.

‘कालपर्यंत तुम्ही आमचं प्रेम अनुभवलंत, आता मशालीची धग काय आहे ती बघा. या मशालीच्या धगीत तुमचं कमळ, नुसतं मळ राहिलंय, ते कसं कोमेजतं ते बघा. तुम्ही कोण आम्हाला सर्टिफिकेट देणारे. जेव्हा 1966 साली शिवसेनेचा जन्म झाला. शिवसेनाप्रमुखांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला जन्म दिला तेव्हा मोदीजी तुम्ही हिमालयात असाल किंवा रेल्वे स्टेशनवर असाल. तुमचं नक्की काय ते काहीच कळत नाही. शिवसेनेला नकली सेना म्हणताय. तेव्हा शिवसेना सोबत होती म्हणून दिल्लीच्या तख्तावर बसलात. आता सोबत नाही म्हणून दिल्लीच्या तख्तापर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही. संकटकाळात मदत करणाऱ्या शिवसेनेला तुम्ही नकली म्हणता. तुमच्या पक्षाचा भाकड आणि भेकड जनता पक्ष झालेला आहे. प्रत्येक ठिकाणी माणसं पैसे देऊन आणावी लागताहेत. इथे जमलेले आहेत, ते खरं प्रेम आहे. आज जणू काही सगळे प्रश्न सुटलेत अशागत शिवसेनेला तुम्ही शत्रू मानताय. तुम्हाला ही देशाभिमानी, कडवट शिवसेना नकोय. तुम्ही कोणाचा प्रचार करताय? 2014 आणि 2019साली मोदींबद्दल आम्हालाही अभिमान होता. काय ती छाती, काय ती दाढी. एक अकेला सब पे भारी. आता आजूबाजूला भ्रष्टाचारी. कुठून ही अवदसा आठवली तुम्हाला कळत नाही.’ असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

घराणेशाहीवर बोलणाऱ्या मोदींच्या दुटप्पीपणावर बोलतानाही उद्धव ठाकरेंनी घणाघात केले. ‘पत्रकार रवीश कुमार यांनी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवन्ना याचं सेक्स स्कँडल बाहेर काढलं. आणि याच प्रज्वलला मत द्या, म्हणजे माझे हात बळकट होतील, असं मोदी सांगत होते. हे बळकट नव्हे कळकट हात आहेत. ही तुमची संस्कृती? अटलजींचा आत्मा आज रडत असेल आणि म्हणेल आज कुठल्या नाकर्त्याच्या हातात भारतीय जनता पक्ष आहे. सेक्स स्कँडल करणाऱ्यांची घराणेशाही तुम्हाला चालते. त्यांना तुम्ही पाठिंबा देता. व्यासपीठावर घेऊन मिठ्या मारता. प्रचार करता. पण शिवसेनेची घराणेशाही तुम्हाला चालत नाही.’ असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.