योग अन् शिल्पकला

योग हे केवळ एक शास्त्र किंवा आरोग्यासाठी केला जाणारा व्यायाम इतक्यापुरता मर्यादित नाही, तर या योगाभ्यासाने भारताचे भावविश्व आणि कलाविश्वही व्यापलेले आहे.

गेल्या आठवडय़ामध्ये मी काही कामासाठी हैदराबादला आणि नंतर छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो. त्या ठिकाणी फिरताना योगाभ्यासाचे कला विश्वातील योगदान हे विशेष रीतीने मला जाणवले. अनेकदा आपण देव-देवतांच्या, ऋषी-मुनींच्या, संतांच्या मूर्ती बघतो आणि त्यांचे सौंदर्य, त्यांच्या चेहऱयावरील हावभाव, दागिन्यांची कलाकुसर यांचे कौतुक आपण करतो. या मूर्ती एका विशिष्ट आसनामध्ये बसलेल्या असतात. त्यांच्या हातांनी त्यांनी एक विशिष्ट मुद्रा धारण केलेली असते. ही मुद्रा एक विशेष भाव अथवा अर्थ व्यक्त करते, या गोष्टींकडे बरेचदा आपले लक्ष जात नाही. हैदराबादमध्ये रामानुजाचार्य यांची विश्व प्रसिद्ध मूर्ती (स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी) ही सुखासनात किंवा स्वस्तिकासनात बसलेली आहे. त्यांनी नमस्कार केलेला आहे. अर्थात नमस्कार मुद्रा आहे. खाली असलेल्या 108 विष्णू मंदिरामध्ये भगवान विष्णूंच्या मूर्ती कुठल्या ना कुठल्या आसनांमध्ये आहे. अनेकदा भगवान विष्णूंच्या शेषशायी मुद्रेतील मूर्ती यांना आपण त्यांची योगनिद्रा किंवा शवासनातील शिल्प अवश्य म्हणू शकतो.

अजंठाची शिल्प चित्रकला
छत्रपती संभाजीनगरच्या अजंता लेण्यामधील भगवान बुद्धांच्या एकापेक्षा एक अप्रतिम सुंदर अशा मूर्ती आहेत, ज्या कुठल्या ना कुठल्या आसनामध्ये आहेत आणि त्यांच्या हातांच्या विशेष मुद्रा आहेत. भगवान बुद्धांनी सारनाथ येथे जेव्हा आपले पहिले प्रवचन दिले, त्यावेळी ते बसले होते त्या आसनाला प्रलंब पादासन असे म्हणतात. त्यांच्या हातांची मुद्रा ही विश्व प्रसिद्ध ‘धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा’ म्हणून विख्यात आहे. काही ठिकाणी योगनिद्रा आहे किंवा बालासन किंवा शवासनामध्येही बुद्ध दिसून येतात. ही शिल्पे अत्यंत रम्य आहेत.

वेरुळची लेणी
वेरुळच्या बुद्ध लेण्यांमध्येही भगवान बुद्धांच्या प्रलंब पादासनातील किंवा पद्मासनातील अनेक मूर्ती आहेत.

कैलास-काव्य
कैलास लेणे जे वेरुळ शिल्पामधील अत्यंत महत्त्वाचे आणि प्रमुख लेणे आहे त्या लेण्यांमध्ये देवीदेवतांच्या अनेक मूर्ती आणि शिल्पे आहे. यातील अनेक मूर्तींमध्ये देव हे अभयमुद्रेमध्ये किंवा वरदमुद्रेमध्ये दाखवले आहेत. भगवान शंकरांचे तांडव नृत्य आणि नंतर त्यांचा नटराज अवतार ज्या शिल्पावरून नटराजआसन आले आहे ते तर अत्यंत सुंदर शिल्प आहे.योग देशभरात सर्वत्र व्यापलेला आहे. योगाभ्यासाने आपले कलाविश्व आणि भावविश्व, अध्यात्म आणि आरोग्य या सर्वांना स्पर्श केला आहे आणि म्हणून योग एक सर्वस्पर्शी शास्त्र आहे. काही ठिकाणी याचे रूपांतर कलेमध्ये झाले आहे. शास्त्र आणि कला यांचा सुंदर संगम आपल्याला अजंता आणि वेरुळच्या लेण्यांमध्ये दिसून येतो.

अष्टविनायक
बहुतेक वेळा भगवान गणेशांच्या मूर्ती भद्रासनात दिसून येतात.
सीए अभिजित कुळकर्णी
योगशिक्षक, भारतीय योग मंदिर
www.bymyoga.in