कुर्ला भाभा रुग्णालयात आता अतिरिक्त सुरक्षा रक्षक नेमणार; शिवसेनेच्या मागणीला यश

पालिकेच्या कुर्ला भाभा रुग्णालयात परिचारिकेला झालेल्या मागणीनंतर आता या रुग्णालयात अतिरिक्त सुरक्षा रक्षक नेमण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. बुधवारी रात्री एका परिचारिकेला मारहाण झाल्यानंतर काल सर्व आरोग्य कर्मचाऱयांनी काम बंद आंदोलन केले होते. त्यामुळे रुग्णसेवेवर मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे रुग्णालयात म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांच्याकडून अतिरिक्त सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी करण्यात आली होती.

महानगरपालिकेच्या कुर्ला येथील खान बहादूर भाभा रूग्णालयात रूग्ण आणि कर्मचारी यांच्यातील वादाच्या प्रसंगानंतर कर्मचारी वर्गाने काल काम बंद आंदोलनाचा पावित्रा घेतला होता. या घटनेनंतर रूग्णाने पोलीस ठाण्यात कर्मचारी वर्गाची माफी मागितल्याने हा वाद संपुष्टात आला. त्यानंतर संपूर्ण कर्मचारी वर्गदेखील पुन्हा कामावर रूजू झाला. या घटनेनंतर खान बहादूर भाभा रूग्णालय प्रशासनाने काही तातडीच्या उपाययोजना करत सुरक्षा व्यवस्था आणि प्रवेश यंत्रणा प्रभावीपणे वापरण्याचा निर्णय घेतला आहे. भाभा रूग्णालयात एका महिला रूग्णाला  30 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 वाजता तात्काळ वैद्यकीय विभागात  दाखल करण्यात आले होते. त्यानंतर 1 मे रोजी दुपारी या रूग्णाला सदर रूग्णालयातील चौथ्या मजल्यावरील महिला रूग्ण कक्षात स्थलांतरित करण्यात आले होते. रात्री 11.00 वाजता दाखल रूग्णांना औषधे व इंजेक्शन देण्याची वेळ होती. तसेच कक्षामध्ये स्वच्छतेची कामे सुरू असल्याने परिचारिका यांनी कक्षामध्ये असलेल्या रूग्णांच्याच नातेवाईकांना बाहेर जाण्यास सांगितले. यावेळी रूग्ण महिलेजवळ जाऊन तिच्यासोबत असलेल्या  नातेवाईकांना देखील बाहेर जाण्यास सांगितले. परंतु रूग्णाच्या नातेवाईकांनी बाहेर जाण्यास नकार देत ते तिथेच बसून राहिले. त्यातून वाद होवून रूग्णाने दोन्ही परिचारिकांना यावेळी शिवीगाळ केली. वादावादीनंतर काही वेळाने रुग्णाच्या नातेवाईकाने परिचारिकेच्या कानशिलात लगावली होती. त्यामुळे वाद निर्माण झाला होता.