
शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर पावले उचलत उत्तर परिमंडळ 3 च्या हद्दीत दहिसर, बोरिवली, कांदिवली परिसरामध्ये दहशत पसरवणाऱ्या रेकॉर्डवरील 12 गुंडांना पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी दणका दिला. या 12 गुंडांना एक वर्षासाठी मुंबई शहर आणि उपनगरातून तडीपार करण्यात आले आहे.
महत्त्वाचे सण-उत्सव जवळ येत आहेत. ही बाब लक्षात घेत कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने उत्तर परिमंडळ 3 मधल्या पोलीस ठाण्यामधील रेकॉर्डवर असणाऱ्या गुन्हेगारांचा आढावा घेण्यात आला. त्यातून परिसरात सातत्याने दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या, घातक शस्त्राचा वापर करून धमकावणे, व्यावसायिकांना धमकावणे, मारहाण करणे, शिवीगाळ, हप्तेवसुली, खंडणी, जबरी चोरी, घातक शस्त्राच्या धाकाने पैसे उकळणे, सार्वजनिक शांततेला बाधा पोहचवणे असे गुन्हे असलेल्या 12 गुंडांची यादी बनवण्यात आली.
महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 57(1)(अ )(1 ) नुसार कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यातील जतीन धोडी, शौकतअली नियामत अलीवर कारवाई केली. तर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56(1)(अ)(ब) नुसार समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आसिफ पाशा पठाण, सतीशपुमार त्रिलोकीनाथ सोनी ऊर्फ जगत, कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याअंतर्गत आदेश अरुण लगाडे, दहिसर पोलीस ठाण्याअंतर्गत कपिल सुरेश माने, सुजित रामपाल मिश्रा, रामेश्वर बाळासाहेब ठेंगे, जगदीश कलीराम जोशी उर्फ सुरेश विरोधात कारवाई केली. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 नुसार समता नगर पोलीस ठाणे हद्दीतील परवेझ हुसेन पटेल, सागर सुनील निगुडकर आणि जय उपेश पटेल विरोधात ही कारवाई करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी सांगितले.
हद्दपार केलेले हे गुंड पुन्हा तुमच्या परिसरात दिसल्यास त्याची माहिती पोलिसांना कळवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.






























































