
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भासह घाट प्रदेशावर दाट ढग निर्माण झाले आहेत. त्यामुळे राज्यात उद्या राज्यात अतिमुसळधार पाऊस होणार आहे. या वेळी जोरदार वादळी वारे वाहणार असल्याने हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
या विभागांना ‘रेड अलर्ट’
सातारा घाट विभाग, पुणे घाट विभाग, नाशिक आणि घाट विभागासह धुळे, जळगावमध्ये अतिमुसळधार पाऊस होईल. त्यामुळे या विभागांना हवामान विभागाकडून ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. तर रायगड, ठाणे, पालघर, नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यांसाठी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने आर्द्रतायुक्त वाऱ्याचे प्रमाण वाढले आहे. या स्थितीमुळे ढगांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर झाली असून काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. पावसाच्या अतिमुसळधार स्थितीचे केंद्र विदर्भ आणि मध्य प्रदेशालगत असून ते तीव्र स्वरूपात आहे.
मुंबईतही वादळी पाऊस
हवामान विभागाने मुंबईमध्येही वादळी पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. शिवाय रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट विभाग, पुणे, अहिल्या नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्येही वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.






























































