USA Shooting: नेवाडा विद्यापीठातील गोळीबारात तिघांचा मृत्यू, हल्लेखोराचा खात्मा

अमेरिकेमधील लास वेगास शहरामध्ये एक भयंकर घटना घडली आहे. या शहरातील नेवाडा विद्यापीठात कॅम्पसमध्ये बुधवारी गोळीबार झाल्याची घटना घडली. या गोळीबारात तीन लोकांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी या घटनेचा पुढील तपास सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला तेथील स्थानिक वेळेनुसार रात्री 11:45 च्या सुमारास झाला. या चकमकीत तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहचून तेथील परिस्थिती आटोक्यात आणली. हल्लेखोरांचा शोध घेत असताना तेथील स्थानिक वेळेनुसार दुपारी 12.30 च्या सुमारास गोळीबार करणारा एक संशयित मृत अवस्थेत सापडला. संशयिताचा मृत्यू कसा झाला हे समजू शकलेले नाही. पोलिसांनीही अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

नेवाडा विद्यापीठ प्रशासनातर्फे गोळीबार होण्याच्या आधी एका ट्वीट करण्यात आले होते. यात असे लिहिले होते की, बीम हॉल बिजनेस शाळेजवळील एका इमारतीच्या आसपास काही हल्लेखोर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न कारावे. गोळीबाराचा इशारा मिळाल्यानंतर विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी आपला जीव वाचवण्यासाठी विद्यापीठातील त्यांच्या खोलीत स्वत:ला कोंडून घेतले होते.

गोळीबाराची 38 वी घटना

अमेरिकेमध्ये झालेल्या गोळीबारांच्या घटना या रोज नवा विक्रम प्रस्थापित करत आहेत. गोळीबारात 4 किंवा त्यापेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची ही या वर्षातली 38 वी घटना आहे.  याआधी अमेरिकेत झालेल्या गोळीबारात सर्वाधिक नागरीक मृत्युमुखी पडल्याची घटना 2017 साली झाली होती. 2017 साली लास वेगासमध्ये गोळीबाराच्या घटनेत 60 जणांचा मृत्यू झाला होता.