म्यानमारच्या 718 नागरिकांची मणिपूरमध्ये घुसखोरी, चिंता वाढली

हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये आता घुसखोरीमुळे चिंता वाढली आहे. राज्य सरकारच्या वतीने आसाम रायफल्सकडून या प्रकरणाची माहिती मागवण्यात आली आहे. जुलैमध्ये दोन दिवसांत म्यानमारच्या 700 हून अधिक नागरिकांनी सीमा ओलांडून मणिपूरमध्ये प्रवेश केल्याची माहिती मिळत आहे. कोणत्याही कागदपत्रांशिवाय या लोकांना प्रवेश कसा दिला, हा प्रश्न आता सरकारपुढे उभा राहिला आहे. विशेष म्हणजे गेल्या शनिवारीही मणिपूरमध्ये मोठा हिंसाचार भडकल्याची माहिती समोर आली होती.

सीमा सुरक्षेची जबाबदारी असलेल्या आसाम रायफल्सला 22 आणि 23 जुलै रोजी मणिपूरमध्ये म्यानमारच्या 718 नागरिकांनी घुसखोरी केल्याची माहिती देण्यात आली. हिंदुस्थानात पोहोचलेल्या म्यानमारच्या नागरिकांनी सोबत शस्त्रे आणली आहेत की काय, याचीही चिंता राज्य सरकारला सतावत आहे. आसाम रायफल्सला सेक्टर 28 मध्ये 718 निर्वासितांनी सीमा ओलांडून चंदेल जिल्ह्यातून मणिपूरमध्ये प्रवेश केल्याची माहिती दिली होती.

मणिपूरच्या गृह मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार आसाम रायफल्सला कागदपत्रांशिवाय येणाऱ्या म्यानमारच्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. या निवेदनात म्हटले आहे, “राज्य सरकार 718 निर्वासितांच्या बेकायदेशीर प्रवेशाची गंभीर दखल घेत आहे. कारण सध्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या समस्यांमुळे त्याचे आंतरराष्ट्रीय परिणाम होऊ शकतात.”

आसाम रायफल्सच्या अधिकाऱ्यांकडूनही याप्रकरणी अहवाल मागवण्यात आल्याचे मणिपूर सरकारचे म्हणणे आहे. यासोबतच या नागरिकांना म्यानमारमध्ये परत पाठवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. याशिवाय चंदेल जिल्ह्याचे उपायुक्त आणि पोलिस अधीक्षकांनाही राज्य सरकारने या प्रकरणाची माहिती गोळा करून म्यानमारमधील नागरिकांची बायोमेट्रिक्स छायाचित्रे ठेवण्यास सांगितले आहे.