
दांडगुरी-बोर्लीपंचतन रस्त्याचे रुंदीकरण, कार्पेट, सिलकोटचे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे तेथील रस्त्यांची अक्षरशः दुरवस्था झाली असून प्रवास ‘खड्डे’तर झाला आहे. खराब रस्ता व ठिकठिकाणी पडलेले खड्डे यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत. पाच किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी अर्धा ते पाऊण तासाचा अवधी लागत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दांडगुरी-बोलींपंचतन मार्ग दिवसेंदिवस अपघाताला आमंत्रण ठरत आहे.
श्रीवर्धन-दिघी हा रस्ता तालुक्याला जोडणारा महत्त्वाचा असून रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम तीन वर्षांपूर्वी पूर्ण झाले. 29 किलोमीटरच्या रस्त्याचे काम दोन टप्प्यात पार पडले. त्यातील वडवली फाट्यापर्यंतचा रस्ता डांबरीकरणाचा आहे, तर वडवलीपासून पुढे दिघीपर्यंतचा मार्ग सिमेंट काँक्रीटचा आहे. मात्र याच मार्गावरील दांडगुरी ते बोर्लीपंचतन या पाच किलोमीटरच्या रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.
आसुफ, खुजारे, कार्ले व बोर्लीपंचतन येथील दत्तमंदिराजवळील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. खराब रस्त्यामुळे दुचाकीस्वारांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे.
एखादा अपघात झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन या जीवघेण्या रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
रस्त्याच्या साईडपट्ट्या व खुजारे येथील मोरीच्या कामामुळे रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी विलंब झाला, परंतु आता ते काम पूर्ण झाले असून पुढील दहा ते पंधरा दिवसात रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार असून जानेवारीअखेरपर्यंत हा रस्ता पूर्ण होईल. तसेच मार्गावरील सर्व खड्डे आठवडाभरात भरण्यात येतील.
तुषार लुंगे, उपविभागीय अभियंता





























































