
पालिकेच्या माध्यमातून महापौर आयोजित हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बाल चित्रकला स्पर्धेत तब्बल 86 हजार 356 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. 1 मार्च रोजी झालेल्या या स्पर्धेतील 65 विजेत्यांना शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांच्या हस्ते आज गौरविण्यात आले. या स्पर्धेत पाचशे जणांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.
जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बाल चित्रकला स्पर्धा दरवर्षी पालिकेच्या माध्यमातून आयोजित केली जाते. विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती आणि कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली जाते. या वर्षी स्पर्धेचे 17 वे वर्ष आहे. मुंबईच्या विविध भागांत 51 ठिकाणी ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा निकाल महापौर रितू तावडे यांनी दिनांक 24 मार्च रोजी घोषित केला होता. तर आज भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन सभागृहात विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.
विजेत्यांना मिळाले 25 हजारांचे बक्षीस
प्रत्येक गटातील प्रथम येणाऱया विद्यार्थ्यास 25 हजार रुपये, द्वितीय क्रमांक पटकावणाऱया विद्यार्थ्यांस प्रत्येकी 20 हजार रुपये आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱया विद्यार्थ्यांस 15 हजार रुपये, पदक आणि प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले. प्रत्येक गटातील प्रत्येकी दहा विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून प्रत्येकी 5 हजार रुपये आणि पदक तसेच प्रशस्तिपत्र देण्यात आले. तसेच विभाग स्तरावर प्रत्येक गटात 5 याप्रमाणे 25 अशी एकूण 25 प्रशासकीय विभागांमध्ये 625 उत्तम चित्रांना प्रत्येकी 500 रुपयांचे रोख पारितोषिके आणि पदक देण्यात आले.




























































