पोलीस डायरी – भक्षक नको, रक्षक व्हा! मुंबई, पुण्यात चंबळच्या डाकूंची भरती!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रभाकर पवार, [email protected]

रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या मुंबई सेंट्रल पोलीस ठाण्याच्या तीन रेल्वे पोलिसांना नुकतेच सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. राजस्थानचे सराफ कमलकुमार सोनी हे आपल्या लहान मुलीसह सोन्याच्या एका प्रदर्शनासाठी मुंबईत आले होते. आठ दिवसांचे आपले वास्तव्य संपल्यानंतर ते पुन्हा राजस्थानला रेल्वेने जाण्यासाठी निघाले असता त्यांना मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर अडविण्यात आले व त्यांच्या बॅगेची तपासणी केली असता त्यांच्या बॅगेत ३२ हजारांचे सोने आढळून आले. या सोन्याच्या तुकड्याची पावती नसल्यामुळे रेल्वे पोलिसांनी सराफ कमलकुमार यांच्याकडे पैशांची मागणी केली, परंतु कमलकुमार यांनी पैसे देण्यास नकार दिला तेव्हा रेल्वे पोलिसांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. कमलकुमार यांच्या ७वर्षांच्या मुलीनेही गयावया केली, “रेल्वे सुटण्याची वेळ जवळ आली आहे. आम्हाला सोडा” अशीही या मुलीने विनंती केली. परंतु पैसे दिल्याशिवाय सोडणार नाही. अटक करू अशी धमकी त्या मुलीला पोलिसांनी दिली तेव्हा नाइलाज म्हणून कमलकुमार यांनी ३० हजार रुपये रोख रक्कम पोलिसांना देऊन आपली सुटका करून घेतली.

राजस्थानला पोहोचल्यानंतर कमलकुमार यांनी रतनगड पोलिसांत मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांविरुद्ध तक्रार केली. हा गुन्हा मुंबई सेंट्रल पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्यावर तपासात तीन पोलीस दोषी असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळले. त्या तिन्ही पोलिसांना त्यांची वर्तणूक पाहून नुकतेच बडतर्फ करण्यात आले आहे. ही घटना ताजी असताना गेल्या आठवड्यात मुंबईच्या जोगेश्वरी व बीकेसी पोलीस ठाण्यातील २ पोलीस शिपायांना अपहरण व जबरी चोरीच्या गुन्ह्यात जुहू पोलिसांनी अटक केली आहे. तर पुण्यातील अर्धा डझन स्त्री पुरुष पोलिसांवर नुकतेच खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रश्न पडतो. पोलीस दलात खरोखर गरजू पीडित उमेदवारांची भरती करण्यात आली आहे की चंबळच्या डाकूंची भरती करण्यात आली आहे.

अधूनमधून तोतया पोलिसांना पकडले जाते, परंतु अलीकडे तोतयांपेक्षा ‘खरेच’ पोलीस मोठ्या प्रमाणात लुटमार करताना आढळून येत आहेत. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा दिवसेंदिवस डागाळत चालली आहे. सातव्या वेतन आयोगानंतर पोलिसांचे वेतन पूर्वीच्या तुलनेत निश्चितच वाढले आहे. तरीही पोलीस भ्रष्ट मार्गाचा अवलंब का करीत आहेत याचे आश्चर्य वाटते. चुकीच्या मार्गाने मिळवलेला पैसा कधीही समाधान देत नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे, परंतु अलीकडे पोलीस दलात नव्याने भरती झालेल्या तरुणांमध्ये कर्तव्याची जाणीव दिसून येत नाही. त्यांच्यामध्ये शिस्तीचा अभाव व जलद पैसा कमावण्याची मानसिकता दिसून येत आहे. दर एक-दोन दिवसांनी मुंबईसह महाराष्ट्रातील एकतरी पोलीस लाच घेताना अॅन्टी करप्शनकडून रंगेहाथ पकडला जात आहे. आपला वरिष्ठ अधिकारी लाखो रुपये कमवतो, मग आपण मागे का रहावे, असा विचार करून चतुर्थ श्रेणीतले बरेच कर्मचारी आपले उखळ पांढरे करून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

पोलिसांना समाजात प्रतिष्ठा आहे. मानसन्मान आहे यासाठी कर्तबगार पोलिसांचा त्याग आहे. आपला जीव धोक्यात घालून त्यांनी जनतेचा विश्वास प्राप्त केला आहे. पोलीस दलाची प्रतिष्ठा एका दिवसात निर्माण होत नाही. ती एखाद्या घटनेने नष्टही होते. बहुसंख्य पोलीस प्रामाणिकपणे काम करतात. वर्दीशी इमान राखतात, परंतु काहींच्या गैरवर्तनामुळे पोलीस दिवसेंदिवस बदनाम होत चालले आहेत. रक्षकाऐवजी ते भक्षक बनत चालले आहेत. हे फारच चिंतनीय आहे. कायद्याचे रक्षक समजल्या जाणाऱ्यांना कायद्याची भीतीच राहिलेली नाही. प्रत्येक पोलिसाने स्वतःचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. वर्दीचा मान राखला पाहिजे, परंतु वरिष्ठच भ्रष्ट असेल व त्याने पैसे मोजून पोस्टिंग मिळवलेली असेल तर कनिष्ठ तळागाळाचा पोलीस ‘रॉबऱ्या’ करणार नाही तर काय करणार?

सरकारी नोकरी मिळत नाही, मिळाली तर ती इमानाने केली जात नाही. मग स्वतःशी प्रामाणिक नसलेली व्यक्ती जनतेला काय न्याय देणार? समाजात खाकी वर्दीला जितका मानसन्मान आहे, तितका कोणत्याच सरकारी खात्यातील लोकसेवकाला नाही. कर्तव्य बजावत असताना पोलीस शहीद झाला, कामी आला तर त्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातात. बंदुकीच्या फैरी झाडून सलामी दिली जाते. आता निवृत्त झाल्यानंतर निधन झालेल्या पोलिसांनाही हा मान शासनाकडून मिळणार आहे. तेव्हा भ्रष्ट पोलिसांनो, एहसान फरामोश, कृतघ्न होऊ नका. अजूनही वेळ गेलेली नाही. भक्षक होऊ नका, रक्षक व्हा! मरणोत्तर शासकीय मानसन्मान मिळवा. पोलीस खात्यात इमानाने काम करा. चंबळच्या डाकूंप्रमाणे रॉबऱ्या करू नका.