
आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार आणि लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे कुलपती अशोक मित्तल यांच्या मालमत्तांवर अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी छापे टाकले. परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या कथित उल्लंघनाप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, यामुळे पंजाबच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
अशोक मित्तल हे ‘लव्हली ग्रुप’चे प्रमुख आहेत. ईडीच्या पथकांनी पंजाब आणि गुरुग्राममधील 8 ते 9 ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले. लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या जालंधर येथील कॅम्पसमध्ये ईडीच्या पथकाने झाडाझडती घेतली. तसेच लव्हली ऑटोज, लव्हली स्वीट्स आणि लव्हली डिस्टन्स एज्युकेशन सेंटरच्या कार्यालयांवरही छापे टाकले. यासर मित्तल यांचे घर आणि फार्महाऊसवर ईडीचे पथक पोहोचल्याचे कळते.
मित्तल यांचे पुत्र आणि त्यांचे भाऊ रमेश आणि नरेश मित्तल यांच्याशी संबंधित ठिकाणांचीही ईडीच्या पथकाकडून झडती घेण्यात आली. परदेशातील आर्थिक व्यवहार आणि निधीच्या प्रवाहातील संशयास्पद अनियमिततेमुळे ही कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिल्याचे वृत्त ‘इंडिया टूडे‘ने दिले आहे.
आम आदमी पार्टीने राज्यसभा उपनेते पदावरून राघव चढ्ढा यांना हटवून त्यांच्या जागी अशोक मित्तल यांची नियुक्ती केली होती. या नियुक्तीनंतर लगेचच ही कारवाई झाल्याने ‘आप’ने आक्रमक पवित्रा घेत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजपने पंजाब निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राज्यातील जनता या कारवाईला चोख प्रत्युत्तर देईल, असे आपचे सर्वेसर्वा आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले.
मोदी जी ने पंजाब में चुनावों की तैयारी शुरू कर दी। लेकिन पंजाब के लोग ये बर्दाश्त नहीं करेंगे। बीजेपी को इसका करारा जवाब देंगे। https://t.co/0yorKVftpM
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) April 15, 2026
दरम्यान, राजदचे नेते मनोज झा यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. अशोक मित्तल यांना राज्यसभेचे उपनेते केले नसते तर त्यांच्यावर हा छापा पडला नसता. पुढील लक्ष्य कोण असेल हे आता आपण आधीच ओळखू शकतो. जर एखाद्या पक्षाने कोणाला नवीन जबाबदारी दिली, तर त्यांच्यावर कारवाई होणे जवळपास निश्चितच वाटते, असे ते म्हणाले.
VIDEO | On ED raids against AAP MP Ashok Mittal, RJD leader Manoj Jha (@manojkjhadu) said,
“I feel that perhaps if he hadn’t been made the Deputy Leader, this raid might not have happened. It has become so predictable that you can identify the next target in advance. If a party… pic.twitter.com/CCj2SiC8im
— Press Trust of India (@PTI_News) April 15, 2026



























































