
पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम हिंदुस्थानवरही होण्याची शक्यता असून सुमारे 25 लाख लोक गरिबीत ढकलले जाऊ शकतात, असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून देण्यात आला आहे. या परिस्थितीमुळे देशाच्या मानव विकासाच्या प्रगतीवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने (UNDP) ‘पश्चिम आशियातील सैन्यवाढ : आशिया व प्रशांत क्षेत्रातील मानवी विकासावर परिणाम’ या अहवालात म्हटले आहे की, या संघर्षामुळे आशिया-प्रशांत क्षेत्रातील मानवी विकासावर ताण वाढत आहे. इंधन, मालवाहतूक आणि कच्च्या मालाच्या किंमती वाढल्याने नागरिकांची खरेदी क्षमता घटत आहे, अन्नसुरक्षेचा प्रश्न गंभीर होत आहे, तसेच सरकारी तिजोरीवर अतिरिक्त ताण येत आहे. यामुळे लोकांची उपजीविका कमकुवत होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
प्राथमिक अंदाजानुसार, जागतिक स्तरावर सुमारे 88 लाख लोक गरिबीच्या धोक्यात येऊ शकतात. या संघर्षामुळे आशिया-प्रशांत प्रदेशाला सुमारे 299 अब्ज डॉलर्सचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. अहवालानुसार, हिंदुस्थानमध्ये गरिबीतील लोकसंख्या सुमारे 4 लाखांनी वाढून ती 25 लाखांपर्यंत पोहोचू शकते.
या संघर्षामुळे जागतिक स्तरावर गरिबीत ढकलल्या जाणाऱ्या लोकांची संख्या 19 लाखांवरून वाढून 88 लाखांपर्यंत जाऊ शकते, ज्यामध्ये दक्षिण आशियातील लोकांचा मोठा वाटा असेल.
अहवालात नमूद करण्यात आले आहे की, हिंदुस्थानसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशासाठी हा परिणाम तुलनेने मर्यादित असला तरी त्याचे दुष्परिणाम जाणवू शकतात. सर्वात गंभीर परिस्थितीत देशातील गरिबी दर 23.9 टक्क्यांवरून वाढून 24.2 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. यामुळे अतिरिक्त 24,64,698 लोक गरिबीत ढकलले जाऊ शकतात.
याचबरोबर, संकटानंतर देशातील एकूण गरिबांची संख्या 35.15 कोटींवरून वाढून 35.40 कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे जागतिक संघर्षाचा थेट परिणाम हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेवर आणि सामान्य नागरिकांच्या जीवनमानावर होण्याची शक्यता अधोरेखित करण्यात आली आहे.

























































