
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बावनदी पुलाजवळ गेल्या पाच दिवसांपासून एक ट्रक भररस्त्यात बंद अवस्थेत उभा असल्याने वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महामार्गावरील हे वळण अत्यंत अवघड असून, या ठिकाणी आधीच अपघातांचे प्रमाण जास्त आहे. अशातच पाच दिवसांपासून हा ट्रक रस्त्यातच उभा असल्याने या मार्गावरून धावणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि पहाटेच्या सुमारास या ट्रकचा अंदाज येत नसल्याने भीषण अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
या गंभीर समस्येकडे महामार्ग वाहतूक पोलिसांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. इतके दिवस उलटूनही हा ट्रक बाजूला करण्यासाठी कोणतीही पावले उचलली गेली नाहीत, त्यामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या वळणावर वाहनांची गती जास्त असते आणि समोरून येणाऱ्या वाहनांना हा ट्रक वेळीच न दिसल्यास मोठा अनर्थ घडू शकतो. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन हा अडथळा दूर करावा आणि संभाव्य अपघात टाळावा, अशी मागणी जोर धरत आहे. जर वेळीच कार्यवाही झाली नाही, तर एखाद्या निष्पाप प्रवाशाला आपला जीव गमवावा लागण्याची भीती व्यक्त होत आहे.



























































