सहा हजार रायगडकरांचे भटक्या कुत्र्यांनी घेतले चावे; जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांतील धक्कादायक आकडेवारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्ह्यात श्वानदंशाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून भटक्या कुत्र्यांबरोबर राखणदार कुत्र्यांची दहशतही वाढली आहे. मागील जानेवारी ते मार्च या ३ महिन्यांत तब्बल ६ हजार ३०१ जणांना कुत्र्याने चावा घेतला आहे. श्वानदंशाच्या आकडेवारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांना जीवमुठीत घेऊन ये-जा करावी लागत आहे. ग्रामीण भागात राखणदार कुत्रे तर शहरी भागात मोकाट कुत्र्यांची दहशत कायम आहे. मोकाट कुत्रांच्या दहशतीने शहरी तसेच ग्रामीण भागात रात्रीचा फेरफटका मारणेही कठीण झालेले आहे. रात्रपाळी संपवून येणाऱ्या कामगारांना याचा जास्तच त्रास जाणवत असतो. याचबरोबर राखणदार कुत्रेही अचानक हल्ला करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मागील तीन महिन्यांत ६ हजार ३०१ जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचे आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे.

निर्बिजीकरणाची बोंब
मोकाट फिरणारे कुत्रे पकडण्यासाठी जिल्ह्यात अद्याप जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यातच निर्बिणीकरणाचीही बोंब असल्याने मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. जिल्हा प्रशासनाने आता तरी या मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांना लगाम घालण्यासाठी व्यवस्था करावी, अशी मागणी जनसामान्यांतून होत आहे. भुरटे चोर, फळपिकांची चोरी करणारे चोरटे यांना दहशत बसावी म्हणून राखणेसाठी कुत्रे ठेवले जातात. परंतु अनेकवेळा बाजूने बेसावधपणे जाणाऱ्यांच्या अंगावरच हे कुत्रे झडप घालतात. तर दुसरीकडे मोकाट घोळक्याने फिरत असलेले कुत्रे पादचाऱ्यांवर हल्ले करतात. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून या मोकाट सुटलेल्या कुत्र्यांवर उपाय सोधने गरजेचे असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते लवेश नाईक यांनी दिली.