
माथेरान घाटात एका धोकादायक वळणावर सोमवारी आंब्याचे भलेमोठे झाड कोसळले होते. मात्र दोन दिवस उलटूनदेखील प्रशासन ढिम्म असून एकही अधिकारी घटनास्थळावर अद्याप फिरकलेला नाही. त्यामुळे भररस्त्यावर झाडांच्या आलेल्या फांद्यांनी स्थानिकांसह हजारो पर्यटकांची वाटच ‘अडवली’ आहे. अनेक वाहने कसरत करत ये-जा करत असल्याने अपघाताची शक्यता आहे.
माथेरान घाटातील जुमापट्टी येथील एस-टन या धोकादायक वळणावर हे झाड कोसळले आहे. विशेष म्हणजे याच परिसरात आणखी दोन ते तीन झाडे पडल्याची माहिती समोर येत आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. नेरळच्या दिशेने उतारावर असलेल्या या झाडामुळे वाहनचालकांना अक्षरशः कसरत करत मार्ग काढावा लागत असून वाहतुकीला अडथळा ठरत आहे. घाटातील अरुंद रस्ता आणि तीव्र वळण यामुळे परिस्थिती अधिकच धोकादायक बनली आहे.
अधिकारी जागे कधी होणार?
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘अपघात घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?’ असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. आधीच हा घाट अपघातप्रवण म्हणून ओळखला जात असताना रस्त्याची दुरवस्था आणि त्यात भर म्हणून रस्त्यावर पडलेले झाड यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. सोमवारी घडलेल्या या घटनेनंतर आजपर्यंत एकही अधिकारी घटनास्थळी फिरकलेला नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



























































