
<<< साधना गोरे
[email protected]
प्रमाण भाषेतले शब्दांचे अर्थ कोशात चटकन सापडतात, पण मराठीतल्या विविध बोलींतले अनेक शब्द आजही कोणत्याच कोशात सापडत नाही. कधी एखाद्या कोशात त्या शब्दाचा पुसटसा संदर्भ असतो, पण त्याचा आगापीछा काहीच नसतो. म्हणजे तो शब्द मूळ कोणत्या भाषेतला, त्याच्या साखळीतले शब्द कोणते याचा काहीएक मागमूस लागत नाही. शिवाय त्या बोलीतही तो शब्द एखाद्याच अर्थाने वापरात असल्याने त्याचे गणगोत शोधणं महाकठीण होऊन बसतं. मराठीत असे चुकार शब्द चिक्कार आहेत. त्यातलाच एक म्हणजे हरवळ किंवा हरवाळ. मानदेशात त्याचा उच्चार ‘हरवाळ’ असाच केला जातो.
दाते-कर्वे कोशात एक ‘हरवार-ळ’ शब्द आहे. हा शब्द ‘अरुवार’ शब्दापासून आल्याचं म्हटलं आहे आणि त्याचा अर्थ आहे, हलके व मऊ. त्याच्याच पुढे कंसात उदाहरण म्हणून ‘अनारशासारखे पक्वान इ.’ म्हटलं आहे. म्हणजे हलकं, मऊ कशासारखं तर अनारशासारखं. किंवा पुरणपोळीसारखंही म्हणता येईल.
दाते-कर्वे कोशातच ‘हरवळ’ असाही एक शब्द आहे. त्याचे दोन अर्थ दिलेले आहेत. एकाचा अर्थ आहे ‘उग्र’, दुसऱ्याचा अर्थ आहे ‘हयगय’. याच कोशात ‘हरव(वा)ळ’ असा एक शब्द आहे आणि त्याचेही दोन अर्थ दिलेले आहेत. एक अर्थ आहे, खेळकर व आनंदी आणि दुसरा अर्थ आहे चपळ. यांतील पहिला अर्थ म्हणजे ‘खेळकर व आनंदी’ हे मूळ अर्थ असल्याचं म्हटलं आहे, तर ‘चपळ’ हा अर्थ माणदेशात वापरला जात असल्याचं म्हटलं आहे. बस, एवढाच संदर्भ आणि तोही फक्त याच कोशात सापडला. त्यामुळे मूळ अर्थ बदलून या शब्दाला चपळ अर्थ कसा प्राप्त झाला, याविषयी काहीच कळत नाही.
माणदेशात म्हणजे प्रामुख्याने सांगली, सातारा या पट्ट्यात हा ‘हरवाळ’ शब्द मोठ्या प्रमाणात वापरला जातो. एखाद्याला कामाचा चांगला उरक असेल तर ‘चांगला हरवाळ गडी आहे’ म्हटलं जातं किंवा ‘पोरगी हरवाळ आहे’ म्हटलं जातं. काही वेळा हा शब्द उपरोधानेही वापरला जातो. उदा. एखाद्याला काम सांगून त्याने वेळेत केलं नाही तर ‘लय हारवाळ दिसतोयस रं!’ असं सहज म्हटलं जातं. माणदेशी बोलीत एवढ्याच संदर्भात हा शब्द वापरला जात असल्याने ‘खेळकर’ व ‘आनंदी’ या अर्थाचं ‘चपळ’ किंवा ‘वेगवान’ या अर्थात कसं रूपांतर झालं, याची काहीच कल्पना करता येत नाही.
दाते-कर्वे यांच्या पुरवणी कोशात एक ‘हरावली’ शब्द दिलेला आहे. त्याचा अर्थ आहे हरवल, हरोळ, आघाडी, बिनी. या अर्थांतील पहिले दोन अर्थ पेशवेकालीन मराठीतील आहेत. मात्र आघाडी आणि बिनी या अर्थावरून ‘पुढे असलेले’ हा अर्थबोध लगेच होतो. कोशात या अर्थाच्या पुढे उदाहरण म्हणून ऐतिहासिक पोवाड्यातील एक वाक्यही दिलेले आहे – “अबुल कासीम हरावलीच्या नात्याने तळापासून पुढे आला असता शत्रूची एक टोळी प्रकट झाली व त्यावर घसरली.’’ या उदाहरणावरून माणदेशात वापरल्या जाणाऱ्या ‘हरवाळ’ शब्दाचा काहीएक संदर्भ लागतो. ‘युद्धात आघाडीवर असणं’, ‘पुढं असणं’ या मूळ अर्थाचे कालांतराने कोणत्याही कामात पुढं असणं, गती असणं हा अर्थ प्राप्त झाला असावा.
खरं तर इथं या शब्दाचा शोध संपायला हवा होता, पण दाते कोशात पोवाड्यातील वरील वाक्यानंतर हा ‘हरावली’ शब्द कन्नडमधील ‘हरावुल’ शब्दापासून आल्याचं म्हटलं आहे. कन्नड-मराठी शब्दकोशात मात्र हा किंवा त्याच्या आसपास जाणाराही शब्द कुठंच सापडत नाही. काहीतरी गवसलं वाटत असतानाच हा ‘हरावुल’ सापडत नसल्याने पुन्हा पंचाईत होते, पण कृ. पां. कुलकर्णींच्या व्युत्पत्ती कोशात ‘हरोल’ शब्द सापडल्यावर हायसं वाटतं. त्यात हा शब्द फार्सीतील ‘हरावुल’ शब्दापासून आल्याचं म्हटलं आहे. मग माधव पटवर्धन यांच्या फार्सा-मराठी कोशात याचा अर्थ आहे – आघाडी, बिनी, पुढारी, पुढे. त्यातही उदाहरण म्हणून एक वाक्य आहे – “तुम्ही या मन्सबियास हराले होऊन मन्सबा सिद्धीस जाय ते करणे.’’ हा अर्थ दाते-कर्वे कोशाप्रमाणेच आहे.
आता इतके कोश धुंडाळल्याचं सार्थकी लागल्यासारखं वाटेल, पण या शब्दाचे कोशांतले अर्थ गोंधळ कमी करायचं काही नावच घेत नाहीयेत. कारण दाते, पटवर्धन यांच्या कोशांत ‘हरोळ’, ‘हरोळी’ यांचे अर्थ आघाडीचे, बिनीचे असे आहेत, तर कुलकर्णी, आपटे यांच्या कोशात त्यांचे अर्थ अगदी उलट म्हणजे ‘सैन्याची पिछाडी’ असा आहे. एवढ्या टोकाचे दोन अर्थ म्हणजे महापंचाईतच म्हणायची !
यावरून आपण इतपंच म्हणू शकतो. दाते आणि पटवर्धन यांच्या कोशांतून माणदेशातल्या ‘हरवाळ’ शब्दाचं मूळ कळतं. कुलकर्णी आणि आपटे यांच्या कोशातला अर्थ (पिछाडी) तुम्हाला आणखी कोणत्या बोलीत सापडला तर सांगा.



























































