शिक्षकांच्या मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलनाचा भडका! महाराष्ट्र शिक्षक सेना आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही कार्यवाही करण्यात येत नाही. त्यामुळे हजारो शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारच्या या नाकर्तेपणाविरोधात आज महाराष्ट्र शिक्षक सेनेचे अध्यक्ष आमदार ज. मो. अभ्यंकर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणाधिकारी कार्यालयांवर धडक मोर्चा काढण्यात आला.

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी याबाबत शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांना निवेदन दिले आहे. शिक्षकांच्या या मागण्या तातडीने पूर्ण करा अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने महाराष्ट्र शिक्षक सेनेच्या नेतृत्वात मुंबई पश्चिम विभाग शिक्षण निरीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मागण्या सरकारने पूर्ण केल्या नाही तर आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शिक्षक सेनेकडून देण्यात आला आहे.

अशा आहेत मागण्या…

अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे थांबवलेले वेतन तातडीने द्यावे, संचमान्यता सुधारावी, राज्यातील शिक्षकांची गेल्या 2 ते 6 वर्षांपासून थकीत देयके अदा करावीत, शाळा बंद होईल अशी भीती दाखवून शिक्षकांवर बीएलओचे अतिरिक्त काम लादू नये, नियोजित पटपडताळणीचा कार्यक्रम रद्द करावा. सप्टेंबर ते डिसेंबर, 2026 मध्ये पटपडताळणीचे आवश्यकतेनुसार नियोजन करावे, अशा मागण्या महाराष्ट्र शिक्षक सेनेकडून करण्यात आल्या आहेत.