
बंगले, गाडय़ा, कार्यालये संपूर्ण वातानुकूलित असतानाही उष्णता वाढीचे कारण देत महायुती सरकारच्या बहुतांश मंत्र्यांचा मुक्काम गेल्या काही दिवसांपासून मंत्रालयाऐवजी घरांमध्येच आहे. मंत्रालयात मंत्र्यांची उपस्थिती नगण्य आहे. मंत्रीच घरकोंबडे झाल्याने मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महत्त्वाच्या कामांसाठी मंत्र्यांच्या घरी किंवा सरकारी निवासस्थानी हेलपाटे घालावे लागत आहेत. त्यामुळे त्यांची पुरती दमछाक होत आहे.
शाळांच्या परीक्षा संपून सुट्टय़ा लागायला सुरुवात झाल्यापासून राज्य शासनातील अनेक मंत्रीही मंत्रालयाची पायरी चढलेले नाहीत. राज्याच्या विविध भागांतून मंत्रालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची मंत्र्यांशी भेट होत नसल्याच्या तक्रारी आहेत. अनेक मंत्री गेले काही दिवस शासकीय बंगल्यांमधून बाहेरच पडलेले नाहीत तर काहींनी थेट आपले गाव गाठले आहे. मंत्रालयातील त्यांच्या दालनात बसणाऱ्या अधिकाऱ्यांकडून भेटायला येणाऱ्या नागरिकांना ‘साहेब टूरवर गेलेत’ अशी उत्तरे मिळत आहेत. सरकारी बंगल्यांवरूनच कारभार हाकणाऱ्या मंत्र्यांमध्ये एकनाथ शिंदे गटातील मंत्र्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यात संजय राठोड, संजय शिरसाट, गुलाबराव पाटील, प्रकाश आबिटकर आदींचा समावेश आहे. हे मंत्री मंत्रालयात येण्याऐवजी तेथील अधिकाऱ्यांनाच फायली घेऊन बंगल्यावर बोलवत आहेत. मंत्रालयापासून मलबार हिलपर्यंत रणरणत्या उन्हातून आणि ट्रफिकमधून हेलपाटे घालताना अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ येऊ लागले आहेत. व्हिडीओs कॉन्फरन्सद्वारे मंत्री अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत आणि त्यातून त्यांना बंगल्यावर येण्याचे निर्देश देत आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.





























































