
राज्याच्या विविध क्षेत्रांमध्ये 60 लाखांपेक्षा अधिक कामगार कार्यरत आहेत. त्यांचे कष्ट, प्रामाणिकपणा आणि समर्पणामुळे महाराष्ट्र प्रगतिपथावर पोहोचला. त्या कामगारांना योग्य न्याय व सन्मान मिळालाच पाहिजे आणि त्यासाठी ‘कामगार भूषण’ पुरस्काराची संख्या एकवरून सातपर्यंत वाढवण्यात यावी, अशी मागणी शिवसेना नेते-आमदार सुनील प्रभू यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
सुनील प्रभू यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कामगारमंत्री आकाश फुंडकर यांना पत्र दिले आहे. सात विभागांसाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून ‘कामगार भूषण’ हा एकच पुरस्कार दिला जातो. त्यामुळे अनेक पात्र कामगारांवर अन्याय होतो. ते दुर्लक्षित राहतात. कामगारांमध्ये निर्माण होणारी प्रेरणा व उत्साह कमी होतो. तसेच निवड प्रक्रियेत अनावश्यक ताण व मर्यादा निर्माण होतात असे प्रभू यांनी पत्रात नमूद केले आहे.
राज्यातील प्रत्येक विभागानुसार किमान सात ‘कामगार भूषण’ पुरस्कार देण्याचा निर्णय तातडीने घेण्यात यावा, असे सुनील प्रभू यांनी पत्रात नमूद केले आहे. तसा शासन निर्णय काढण्यात यावा, अशीही मागणी सुनील प्रभू यांनी केली आहे.




























































