खरातच्या दोन भाच्यांची 12 तास झाडाझडती!  चार खात्यांतून प्रत्येकी सव्वाकोटींची उलाढाल, समता पतसंस्थेतील बनावट खात्यांचा तपास सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असून, राहाता येथील समता पतसंस्थेत उघडलेल्या संशयित खात्यांमुळे आर्थिक गैरव्यवहाराचा मोठा आकडा उघड होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशोक खरातने स्वतःच्या सख्ख्या दोन भाच्यांच्या नावांवर बँक खाती उघडून कोट्यवधी रुपयांची उलाढाल केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले. पोलिसांनी या दोन भाच्यांची 12 तास झाडाझडती घेतली.

शिर्डी पोलिसांनी नितीन पोकळे आणि प्रदीप पोकळे या अशोक खरातच्या दोन भाच्यांना ताब्यात घेतले होते. या दोघांनीही ‘आम्ही कोणतेही खाते उघडले नाही किंवा आर्थिक व्यवहार केलेला नाही’, असा दावा केला होता. मात्र, तपासात त्यांच्या नावांवर समता पतसंस्थेत प्रत्येकी दोन अशी एकूण चार खाती असल्याचे समोर आले आहे. या खात्यांमधून प्रत्येकी सुमारे 1 कोटी 20 लाख रुपयांची उलाढाल झाल्याचे उघडकीस आले आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या आरोपानंतर दीपक लोंढे आणि त्यांच्या पत्नी जयश्री लोंढे यांच्या नावांवरही प्रत्येकी दोन खाती असल्याचे उघड झाले. या खात्यांमधूनही प्रत्येकी 1 कोटी 20 लाख रुपयांची उलाढाल झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी दीपक लोंढे यांची चौकशी केली असून, त्यांना चौकशीसाठी पुन्हा हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

समता पतसंस्थेत 57 खातेदारांच्या नावांवर जवळपास 100 खाती उघडण्यात आली असून, या सर्व खात्यांमध्ये अशोक खरात याचे नाव ‘नॉमिनी’ म्हणून नोंदवण्यात आले आहे.

तपासादरम्यान मुंबईतील दिनेश परब व त्यांच्या पत्नीच्या नावावर तसेच प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकर यांच्या नावावरही खाती उघडून व्यवहार करण्यात आल्याचे समोर आले आहे. याशिवाय परिवहन विभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावांवर तीन खाती असल्याचे निष्पन्न झाल्याने या प्रकरणात ‘व्हाईट कॉलर’ कनेक्शन असल्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे पतसंस्थेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून, लवकरच काहींवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.