
शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस अंमलदाराला 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. बुधवारी (दि. 15) सायंकाळी तोफखाना पोलीस ठाणे परिसरात ही कारवाई करण्यात आली.
अनिल गोसावी असे अटक केलेल्या पोलीस अंमलदाराचे नाव असून, या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
छळप्रकरणी पीडित विवाहितेने पतीविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान संबंधित संशयित आरोपीला मदत करण्यासाठी पोलीस अंमलदार अनिल गोसावी याने तक्रारदाराकडे 50 हजार रुपयांची लाच मागितली. या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.
पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बुधवारी सापळा रचला. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तोफखाना पोलीस ठाणे परिसरात ही कारवाई करण्यात आली. गोसावी याने 50 हजारांच्या मागणीपैकी 35 हजार स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती. तक्रारदाराकडून 35 हजार रुपये स्वीकारत असताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.




























































