
हरिवंश सिंग यांची पुन्हा एकदा राज्यसभेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली. राज्यसभेत आज यासंदर्भातील ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे तसेच राज्यसभेतील सर्वच पक्षाच्या गटनेत्यांनी हरिवंश यांचे अभिनंदन केले. राज्यसभेच्या उपसभापतीपदाची हरिवंश यांनी यानिमित्ताने हॅटट्रिक साधली आहे.
लोकनेते जयप्रकाश नारायण यांच्या जन्मगाव सिताब दियारा येथील रहिवासी असल्याने नितीशकुमार यांनी हरिवंश यांना सन्मानाने राज्यसभेवर पाठविले होते. मात्र त्यानंतर नितीशकुमारांनी भाजपशी काडीमोड घेत लालूप्रसाद यादवांच्या पक्षासोबत बिहारमध्ये सरकार स्थापन केल्यानंतरही हरिवंश यांनी उपसभापतीपद सोडले नव्हते. नितीशकुमार यांच्याशी दुरावा निर्माण झाल्यानंतर हरिवंश यांनी भाजपसोबत राहिले. त्याचीच बक्षिसी हरिवंश यांना मिळाली असल्याचे बोलले जात आहे.



























































