बालाकोट, नोटबंदी, सिंदूरचा जादूगर पकडला गेला! राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर कडाडून हल्ला, नवे महिला आरक्षण विधेयक लाजिरवाणे; सत्ता बळकावण्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिला आरक्षणाच्या आड देशाचा राजकीय नकाशा बदलण्याचा मोदी सरकारचा डाव असून नवे विधेयक महिलांना दुबळे बनवेल, अशी टीका काँग्रेसचे नेते लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली. तुमची शक्ती कमी होत आहे. त्यामुळेच मतदारसंघात बदल करण्यात येत आहेत. तुम्ही आसाममध्ये हा प्रकार केला. मात्र आम्ही तुम्हाला आता असे करू देणार नाही. बालाकोट, नोटबंदी, सिंदूरचा जादूगर पकडला गेला, असे म्हणत राहुल गांधी यांनी नाव घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून हल्ला चढवला.

महिला आरक्षणासंदर्भातील विधेयकांवर लोकसभेत दुसऱया दिवशी चर्चा झाली. त्या वेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, नवे महिला आरक्षण विधेयक महिलांना दुबळे बनवेल. हा एक लाजीरवाणा कायदा आहे. याचा महिला सबलीकरणाशी काहीही संबंध नाही. पुन्हा सत्ता बळकावण्याचा तुमचा प्रयत्न आहे. मात्र जादूगर पकडला गेला आहे. पुलवामा, नोटबंदी, सिंदूरमागचा जादूगर पकडला गेला आहे. जादूगर आणि एका उद्योजकामध्ये भागीदारी आहे. पण ही भागीदारी लपलेली आहे. जादूगराच्या संपूर्ण इतिहासात ही लपलेली ताकद आहे, असा टोला राहुल गांधींनी लगावला.

मला जे 20 वर्षांत जमले नाही ते प्रियंकाने 5 मिनिटांत केले

राहुल गांधी यांनी भाषणाच्या सुरुवातीला आणखी एक कोटी केली. ते म्हणाले, मी माझ्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत जे करू शकलो नाही, ते माझ्या बहिणीने 5 मिनिटांत साध्य केले. ते म्हणजे अमित शहा यांच्या चेहऱ्यावर हास्य आणणे. हे मलाही शिकून घ्यावे लागेल.

भाजपला झोंबलाजादूगर

राहुल गांधी यांनी कोणाचेही नाव न घेता ‘जादूगर’ असा उल्लेख केला. त्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आक्षेप घेतला. देशाच्या पंतप्रधानांबाबत राहुल यांनी ज्या शब्दांचा वापर केला, ते कामकाजातून काढून टाकले पाहिजे, असे राजनाथ सिंह म्हणाले. एनडीएच्या खासदारांनीही जादूगर शब्दावरून जोरदार आक्षेप घेतला. अखेर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आक्षेपार्ह उल्लेख कामकाजातून हटवण्याचे आदेश दिले.

मागासवर्गीयांचा हक्क हिरावून घेणारे

देशाच्या राजकारणात काय होत आहे, ते पाहून तुम्ही घाबरले आहात. तुम्हाला देशाचा राजकीय नकाशा बदलायचा आहे. आसाममध्ये तुम्ही जसे केले, तसे आम्ही करू देणार नाही. हे विधेयक अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी प्रवर्गांच्या विरोधात आहे. त्यांचे हक्क हिरावून घेण्याचा हा डाव आहे.

संख्याबळ नाही, तरीही

लोकसभेत विधेयकासाठी आवश्यक संख्याबळ आपल्याकडे नाही, हे मोदी सरकारला ठावूक होते. त्यामुळे मोदी सरकारकडून सर्व खासदारांना समर्थन देण्याची मागणी केली जात होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृह मंत्री अमित शाह, संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू व एनडीएच्या इतर नेत्यांनी विरोधी पक्षांना यासाठी विनंती केली होती.

सर्व कोडं 16 आकडय़ात

राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बालाकोटचे जादूगर असा उल्लेख केल्याने सत्ताधारी सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातला. गांधी यांनी संसदेतील भाषणाचा शेवट करताना 16 या आकडय़ाचा उल्लेख केला. या आकडय़ाचे कोडे नक्की काय आहे? असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे. गांधी यांच्या 16 या आकडय़ाचा अर्थ टीडीपीचे 16 खासदार असा होतो की, 16 मिनिटांचा वादग्रस्त स्पॅण्डलचा समोर आलेला व्हिडीओचा तो संदर्भ आहे का? याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत. राहुल गांधी यांनीदेखील याप्रकरणी भाष्य करताना हे कोडं ज्यांना उलगडलं त्यांनीएक्सवर पोस्ट करावे, असेही सुचवले.

मला आणि मोदींना पत्नी नाही!

भाषणाला सुरुवात करताच महिलांचे महत्त्व सांगताना राहुल गांधी म्हणाले, प्रत्येक जण आयुष्यात महिलांकडून खूप शिकायला मिळाले आहे. आई, बहिणी, पत्नी… या वेळी क्षणभर थांबून राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझ्या आयुष्यात पत्नी नाही. त्यामुळे तसा फिडबॅक आम्हाला मिळत नाही. पण आमच्यासोबत माता आणि भगिनी आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.

काळा टिकाटीकेला डीएमकेच्या खासदार कनिमोळी यांचे प्रत्युत्तर

पंतप्रधान मोदी डीएमकेने काळे कपडे घालून केलेल्या आंदोलनाला ‘काळा टिका’ म्हणत उपरोधिक टीका केली होती. त्यास डीएमकेच्या नेत्या कनिमोळी यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले. काळा रंग हा केवळ दृष्ट काढण्यासाठी नसून तो देवी कालीचा रंग आहे. हक्कांसाठी आमच्या पक्षाचा निषेध सुरूच राहील, असे कनिमोळी म्हणाल्या.