
नागपूर महापालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून काँग्रेसमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले असून पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे. कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार नितीन राऊत यांनी शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या कार्यपद्धतीविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. पक्षात अपमान होत असल्याचा आरोप करत राऊत यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांसह पक्ष सोडण्याचा इशारा दिला आहे.
नागपूर महापालिकेत काँग्रेसला दोन स्वीकृत सदस्यांची संधी मिळणार होती. त्यानुसार शहरातील दोन्ही आमदारांना प्रत्येकी एक सदस्य निवडण्याचा अधिकार देण्याचे ठरल्याचे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. यामुळे पक्षांतर्गत नाराजी वाढू लागली. शहर काँग्रेसमध्ये आ. विकास ठाकरे यांचा मनमर्जी कारभार सुरू आहे. पालिकेतील विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर हे त्यांच्या हातचे बाहुले आहेत. घडलेल्या प्रकाराची गंभीर दखल घेऊन या दोघांचाही राजीनामा घ्यावा, अशी मागणी नितीन राऊत यांनी प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्याकडे केली आहे.






























































