
लोकलमधून उतरताना धक्का लागल्याचा जब विचारणाच्या तरुणाचा डोळा परप्रांतीय बाप-लेकाने जायबंदी केल्याची घटना ताजी असताना आता सीएसएमटी-आसनगाव लोकलमध्ये उभे राहण्यावरून महिला डब्यात ढिश्युम ढिश्युम झाल्याचे समोर आले आहे. ‘बाजूला सरक’ असे म्हणताच दोन महिलांमध्ये बाचाबाची झाली आणि एका महिलेने दुसऱ्या महिलेला मारहाण केली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
आसनगाव लोकल ठाण्याच्या फलाट क्रमांक ६ वर आली. जागा पकडण्यासाठी सर्वच महिलांनी धावाधाव केली, महिला डबा खचाखच भरलेला होता. यातच ‘बाजूला सरक’ असे म्हणताच अनुष्का राव आणि आरोपी महिलेची बाचाबाची सुरू झाली. काही वेळातच या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. महिलेने अनुष्का यांना बेदम मारहाण केली. डब्ब्यात एकच गोंधळ उडाला. याचा व्हिडीओ एका महिला प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. या राड्यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लेडीज डबा नको रे बाबा
अन्य महिलांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र ती महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. किरकोळ जखमी झालेल्या अनुष्का राव यांनी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी आरोपी महिलेविरोधात अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. मारहाण करणाऱ्या महिलेचे नाव अद्याप समजू शकले नाही. याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. भांडखोर महिलांच्या राड्यामुळे अन्य प्रवाशांवर मात्र लेडीज डबा नको रे बाबा असे म्हणण्याची वेळ आली आहे. लोकलमध्ये दादागिरी करणाऱ्या प्रवाशांवर पोलिसांनी वॉच ठेवून कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.





























































