
>> आशीष बनसोडे, [email protected]
मुंबई या मायानगरीच्या मोहापायी घरातून पळून आलेल्या लहान बालकांना त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबई रेल्वे पोलिसांनी राबविलेल्या ‘ऑपरेशन मुस्कान’चे कौतुक करायला हवे.
स्वप्ननगरी मुंबईची भुरळ कोणाला पडली नाही तरच नवल…अगदी लहानग्यांपासून आबालवृद्धांपर्यंत सर्वच या मायानगरीच्या प्रेमात असतात. मग या आकर्षणापोटी अनेक विद्यार्थी घरदार सोडून मुंबईचा रस्ता पकडतात. शिवाय बरेच मुले-मुली विविध कारणांनी घराबाहेर पडतात आणि मुंबईत येऊन धडकतात, पण इथे आल्यावर करायचे काय अशा मनःस्थितीत अडकतात. मुंबईची माहिती नसते, खिशात पैसा नसतो, कोणी ओळखीचं नसते… मग करायचे तर काय आणि जायचे कुठे असा पेच निर्माण होतो. अशा वेळी रेल्वे पोलिसांची नजर त्यांच्यावर पडते आणि त्या बालकांवर नको तो प्रसंग ओढविण्याआधीच पोलीस त्यांना सुरक्षा कवच पुरवते. रेल्वे पोलिसांनी नुकतेच ‘ऑपरेशन मुस्कान’ राबवित अशीच चांगली कामगिरी फत्ते केली आहे.
मुंबई ही सर्वांना सामावून घेणारी आहे. इथे कोणी उपाशी राहत नाही. काही पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी येतात, तर अनेक जण बॉलीवूडच्या आकर्षणापोटी येतात. त्यात अल्पवयीन मुलामुलींची संख्यादेखील मोठी असते. शिवाय बरीच बालके घरात अत्याचार होतो, नीट सांभाळ होत नाही, घरचे हट्ट पुरवत नाहीत म्हणून पळून येतात. हे चित्र तसे रोजचे, पण मुंबईत आल्यानंतर पुढे काय करायचे, कुठे जायचे, कुठे राहायचे असे प्रश्न उपस्थित होतात आणि त्यातून नैराश आल्यानंतर कावऱया बावऱया अवस्थेत स्थानकावरच आसरा घेण्याची वेळ येते. अशा वेळी रेल्वे पोलीस मदतीला धावून येतात.
अल्पवयीन मुले, महिला, वृद्ध हे बेवारस आढळण्याचे प्रमाण लक्षणीय असल्याने अशांना वेळीच ताब्यात घेऊन त्यांची सुखरूप घरवापसी करण्यासाठी रेल्वे पोलीस आयुक्त राकेश कलासागर, उपायुक्त प्रज्ञा जेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक आयुक्त किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक माधुरी घाडगे, उपनिरीक्षक अनामिका सावंत तसेच राधिका कोळसे, अनुराधा राठोड, नविता तांडेल, करुणा शेळके, रजनी बल्लाळ, सेजल मालवणकर या रणरागिणींनी नुकतेच 14 वे ‘ऑपरेशन मुस्कान’ यशस्वीरीत्या राबविले. या मोहिमेदरम्यान रेल्वे स्थानकांवर बेवारस अवस्थेत आढळून आलेल्या 305 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर रेल्वे पोलिसांच्या या महिला पथकाने वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करून काहीही आतापत्ता नसताना त्यापैकी 193 बालकांच्या मातापित्यांना शोधून काढले आणि सुरक्षित त्यांच्या स्वाधीन केले, तर 54 बालकांना बालसुधारगृहामार्फत पालकांच्या ताब्यात देण्यात आले. परंतु अन्य 58 बालकांच्या घरच्यांचा पत्ता न लागल्याने त्यांना सुरक्षितपणे बालगृहात ठेवण्यात आले आहे. त्यात 30 मुली व 28 मुलांचा समावेश आहे.
या मोहिमेंतर्गत इतर जिल्ह्यांतील 14 बालके, तर परराज्यांतील चार असे एकूण 18 बालके रस्ता भरकटण्याआधीच पोलिसांच्या नजरेस पडले. त्यात नऊ मुली व नऊ मुलांचा समोवश आहे, तर रेल्वे पोलिसांच्या महिला अंमलदार पथकाने वर्ष 2012 पासून हरविलेल्या बालकांबाबत कसून शोध घेत तीन बालकांना शोधून काढले. मुंबईच्या आकर्षणापोटी अल्पवयीन मुले-मुली मुंबईत येतात. पण शहराची काहीच माहिती नसल्याने ते भरकटतात. काय करायचे ते त्यांना समजत नाही. अशा वेळी त्यांच्यावर समाजकंटकांची नजर पडून आक्रीत घडण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे आम्ही रेल्वे पोलीस स्थानकात सतत गस्त घालून पालकांविना, तसेच गोंधळलेल्या अवस्थेत सापडणाऱया मुला-मुलींना लगेच ताब्यात घेतो. त्यांना आधार देत त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करतो. त्यांना घरचा पत्ता माहिती असल्यास लगेच कायदेशीर बाबी पूर्ण करून त्यांची घरवापसी करतो.

आमचे हे काम सातत्याने सुरू असल्याचे एपीआय माधुरी घाडगे सांगातात, तर रेल्वे स्थानकांवर सापडणाऱया वृद्धा, महिला, अल्पवयीन मुले-मुली यांची सुरक्षा पाहणे हे आमचे कर्तव्य आहे. आम्ही रेल्वे पोलीस यात अजिबात कसुरी होऊ न देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो. महिला, वृद्ध व अप्लवयीनांच्या सुरक्षेला आमचे प्राधान्य असते. म्हणूनच आमचे निर्भया पथक 24 तास हरविलेल्या, पळून आलेल्या, अपहरण झालेल्या महिला, बालकांचा शोध घेऊन त्यांच्या व त्यांच्या घरच्यांच्या चेहऱयावर ‘मुस्कान’ आणण्याचे काम सातत्याने करीत आहोत. हे मोठे सामाजिक काम आहे. आम्ही आमचे कर्तव्य इमानेइतबारे पार पाडत आहोतच, पण जागरूक व जबाबदार नागरिक या नात्याने प्रत्येक प्रवाशाने स्थानकात भीक मागताना, एकटय़ा अवस्थेत असणाऱया, गोंधळलेल्या महिला, वृद्ध व अल्पवयीन मुले-मुलींना मदतीचा हात देणे आवश्यक आहे. असे कोणी दिसल्यास तेथे तैनात पोलीस अथवा हेल्पलाईनवर संपर्क साधून माहिती दिल्यास आम्हाला वेळेत मदत पुरवणे शक्य होईल.
मुंबई रेल्वे परिसरात भरकटलेल्या कोणावर बाका प्रसंग उद्भवू नये, त्यांची सुरक्षा अबाधित राखणे हे गरजेचे असल्याचे एसीपी किशोर शिंदे म्हणतात.

























































