तमिळनाडूमध्ये पर्यटकांच्या वाहनाचा भीषण अपघात; 8 महिलांसह 9 जण ठार, 5 गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तमिळनाडूतील कोइंबतूर जिल्ह्यात एका पर्यटकांच्या व्हॅनला भीषण अपघात झाला. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून 5 गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 8 महिलांचा आणि एका पुरुषाचा समावेश आहे. जखमींना तातडीने पोल्लाची येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झालेले वाहन केरळमधील पेरिंथलमन्ना येथून आलेल्या 13 पर्यटकांना घेऊन वलपरईहून परत येत होते. याचवेळी कोइंबतूर जिल्ह्यातील वालपराई डोंगररांगामधील हेअरपिन वळणांवर वाहन अनियंत्रित झाले. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हे वाहन थेट 13व्या हेअरपिन वळणावरून 9व्या वळणावर कोसळले. या भीषण अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातस्थळावर रक्तमांसाचा अक्षरश: चिखल झाला होता आणि गाडीचाही पार चक्काचूर झाला होता. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने गाडीतून मृतदेह बाहेर काढले. यावेळी 16 हून अधिक रुग्णवाहिका बचावकार्यासाठी पाचारण करण्यात आल्या होत्या. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

पंतप्रधान, राष्ट्रपतींनी व्यक्त केला शोक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एक्सवर पोस्ट करत या अपघातावर शोक व्यक्त केला आणि मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या.