
>> डॉ. मंजिरी भालेराव, [email protected]
अजिंठा म्हणजे चित्रकला. खरोखरच प्राचीन भारताच्या ऐतिहासिक काळातील चित्रकलेचा अजिंठ्यासारखा नमुना फारसा उपलब्ध नाही. ही चित्रे विहार आणि चैत्यगृहे यांच्या भिंतींवर, छतावर तर कधी खांबांवरही पाहायला मिळतात. या सगळ्या चित्रांचा आशय जातक कथा आणि बुद्धाच्या आयुष्यातील काही घटना असा आहे. अशा प्रकारची शैलगृहे मुख्यत इ.स.च्या 5व्या शतकात तयार झाली असे साधारणपणे मानले जाते. या दुसऱ्या टप्प्यातील गुंफांच्या निर्मितीमध्ये जास्त संख्येने ही चित्रे पाहायला मिळतात.
छत्रपती संभाजीनगरमधील जगप्रसिद्ध अजिंठा हा शैलगृहांचा समूह पाहण्यासाठी जगभरातले आणि भारतातले प्रवासी इथे वर्षभर येत असतात. अनेक लोक अजिंठा-वेरुळ एका दिवसात पाहणार आहोत असे सांगतात. कारण त्यांना ही दोन्ही स्थळे पाहणे आणि समजून घेणे हे किती मोठे आव्हान आहे याची कल्पना नसते. या दोन्ही ठिकाणांमधील अंतर आणि त्यातील आशय या दोन्ही गोष्टींमुळे हे शक्य नाही याचीही जाणीव नसते. जागतिक वारशाच्या यादीमधील या दोन्ही स्थळांची व्यक्तिमत्त्वे ही बहुआयामी आहेत. त्यांचे अनेकविध पैलू आहेत. यापैकी अजिंठा हे आपण किती विविध परिप्रेक्ष्यातून पाहू शकतो, अभ्यासू शकतो याची एक झलक आता आपण पाहूया.
सर्वसाधारणपणे अजिंठा म्हणजे चित्रकला हे एक समीकरण आपल्याला दिसते. खरोखरच प्राचीन भारताच्या ऐतिहासिक काळातील चित्रकलेचा अजिंठ्यासारखा नमुना फारसा उपलब्ध नाही. त्यामुळे चित्रकलेतून दिसणारे रंगरेषा यांनी साकारलेले एक वेगळेच जग आपल्याला पाहायला मिळते. चित्रातून दिसणारे जग आणि शिल्पातून दिसणारे जग यामध्ये हा फरक अगदी स्पष्टपणे दिसतो. चित्रातील जग हे रंगांनी, भावभावनांनीयुक्त असते. त्यामुळे ते जास्त खरे वाटते. तसाच प्रत्यय अजिंठा येथील चित्रे पाहताना येतो.
ही चित्रे विहार आणि चैत्यगृहे यांच्या भिंतींवर, कधी छतावर, तर कधी खांबांवरही पाहायला मिळतात. बहुतेक सगळ्या चित्रांचा आशय हा जातक कथा आणि बुद्धाच्या आयुष्यातील काही घटना हा आहे. बौद्ध साहित्यामध्ये जातक कथा नावाने एकापेक्षा जास्त संग्रह आहेत. तसेच त्यावर काही भाष्यही लिहिली आहेत. या सर्वांमधून काही निवडक कथाच इथे चित्रित केलेल्या आहेत. काळाच्या ओघात त्यांची अवस्था खराब झाली आहे.
जातक कथा म्हणजे भगवान बुद्धांच्या पूर्वजन्माच्या कथा. ज्या प्रकारच्या मूल्यांचा उपदेश या काळातील समाजाला व्हावा असे संघाला वाटत होते त्या मूल्यांचा संदेश देणाऱ्या कथा निवडून त्यांचे चित्रीकरण या विहारात झालेले दिसते. अशा प्रकारची शैलगृहे मुख्यत इ. स. च्या 5 व्या शतकात तयार झाली असे साधारणपणे मानले जाते. या आधीच्या शैलगृहातही काही जातकांचे चित्रीकरण केलेले होते, पण या दुसऱ्या टप्प्यातील गुंफांच्या निर्मितीमध्ये जास्त संख्येने ही चित्रे पाहायला मिळतात. या टप्प्यातील विहारांमध्ये एका खोलीचा वापर गाभाऱ्यासारखा करून त्यात गौतम बुद्धांची मूर्ती कोरलेली दिसते. त्याचप्रमाणे या काळातील चैत्यगृहांमध्ये म्हणजे क्र. 19 आणि 26 मधील स्तूपांवर गौतम बुद्धाची अनुक्रमे उभी आणि सिंहासनावर बसलेली मूर्ती पाहायला मिळतात. आतापर्यंत महाराष्ट्रात निर्माण झालेल्या कोणत्याही गुंफांमध्ये या गोष्टी दिसल्या नाहीत. अजिंठा हे स्थान या प्रकारच्या स्थापत्य आणि कला यांच्या नावीन्यपूर्ण आविष्कारासाठी विशेष ठरतात.
बौद्ध धर्म आणि तत्त्वज्ञान यातील विकास या उदाहरणांवरून पाहायला मिळतो. याशिवाय विविध लोकदेवता, बोधिसत्त्व, उपासकांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या सृजनता आणि समृद्धी देणाऱ्या अशा अनेकविध देवता, उपदेवता, यक्ष यक्षी यांचेही अंकन इथे पाहायला मिळते. लेणे क्रमांक 2 मध्ये अनेक सुरेख चित्रे का दिसतात, पण तेथील मुख्य गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या खोल्यांपैकी एकामध्ये मातृदेवता हारिती, जाम्भाल (काही वेळेस पांचिक असेही नाव येते) आणि दुसऱ्यामध्ये समृद्धी देणारे शंखनिधी पद्मनिधी यांच्या मूर्ती आहेत. सर्वसंगपरित्याग केलेले भिक्षू जिथे राहतात, त्या ठिकाणी या देवतांची शिल्पे असण्याचे काहीच कारण नाही. कारण ते या सर्वांच्या पलीकडे गेलेले आहेत. मग या मूर्ती त्यांच्या विहारात कोरण्याचे कारण काय असेल? त्या काळातील गृहस्थाश्रमी उपासक जेव्हा या स्थळी उपदेश ऐकायला किंवा गौतम बुद्धाचे दर्शन घ्यायला येतील तेव्हा त्यांना या देवतांचेही दर्शन होईल अशी भावना याच्या मागे असावी. त्यामुळे अनेक लहान-मोठ्या शिल्पांमधून हे देव तसेच शुभसूचक चिन्हे इथे पाहायला मिळतात. तत्कालीन बौद्धधर्मीय समाजातील लोकांचे देव नेमके कोण होते हेही समजते. त्यामुळे ज्यांना बौद्ध धर्मातील पुराणकथा, मूर्तिशास्त्र आणि स्थापत्यरचनेचा विकास यांचा अभ्यास करायचा असेल त्यांच्या करिता इथे भरपूर साधने आहेत. पद्मश्री म. के. ढर यांनी या चित्रांमधून दिसणारे भौतिक जीवन या विषयावर खूप बारकाईने काम केले होते. महामहोपाध्याय वा. वि. मिराशी, डॉ. ब्रह्मानंद देशपांडे, डॉ. शोभना गोखले, डॉ. डीटर श्लिंगलोफ, डॉ. राजेश सिंह, डॉ. मधुलिका रेड्डी, रवींद्र कुलकर्णी इ. अभ्यासकांनी अजिंठ्याच्या विविध पैलूंचा अभ्यास केला आहे.
चित्रांचे विविध टप्पे, तंत्र, रंग, त्यांची निर्मिती आणि उत्पादन, उपलब्ध साधनसंपत्ती, मूळ आराखडा साकारणारा कलाकार, त्याचा विचार, कथावस्तू, त्याची साधने, चित्र कायाच्या पूर्वीच्या परंपरा अशा प्रकारच्या अनेक मुद्दय़ांचा अभ्यास या चित्रांवरून करता येऊ शकतो. अनेक अभ्यासकांनी येथील चित्रांचा, त्यांच्या तंत्राचा, शैलीचा, आशय आणि अभिव्यक्ती यांचा सखोल अभ्यास केला आहे. डेक्कन कॉलेजमधील डॉ. श्रीकांत प्रधान यामध्ये अग्रगण्य आहेत. इथे वापरलेल्या रंगांसारखे नैसर्गिक रंग त्यांनी स्वत तयार करून पाहिले आहेत, येथील शैलीच्या परंपरा आणि प्रभाव यांचाही सखोल अभ्यास त्यांनी केला आहे.
अजिंठा येथील त्रुटीत चित्रांची डिजिटल स्वरूपात पुनर्रचना करण्याचे किचकट काम नाशिक येथील कलाकार प्रसाद पवार कित्येक वर्षे चिकाटीने करत आहेत. याशिवाय इतर अनेक अभ्यासकांनी अजिंठ्याच्या विविध पैलूंवर संशोधन केले आहे. त्या सर्वांचा इथे उल्लेख करणे शक्य नाही. तरीही भविष्यातील अभ्यासकांच्या कित्येक पिढ्यांना अजूनही इथे अनेक परिप्रेक्ष्यातून संशोधन करायची संधी शिल्लक आहेत.
अजिंठा म्हटले की, सर्व जाणकारांच्या तोंडावर प्रा. वॉल्टर स्पिंक यांचे नाव येतेच. त्यांच्या आयुष्यातील 60 पेक्षा जास्त वर्षे त्यांनी फक्त अजिंठा या विषयावर काम केले. अनेकांचे मत होते की, अजिंठा समूहातील दुसऱ्या टप्प्यातील लेणी तयार व्हायला 200 वर्षे लागली. सखोल अभ्यासानंतर स्पिंक यांनी हा काळ फक्त 18 ते 20 वर्षांचा आहे हे सप्रमाण सिद्ध केले. वाकाटक घराण्यातील राजा हरिषेण याच्या काळात यांची निर्मिती झाली होती हे दाखवून या विषयावर विपुल लिखाण केले. येथे असलेले शिलालेख आणि समकालीन साहित्य तपासून, त्यांची प्रत्यक्ष गुंफांच्या पुराव्याशी तुलना करून यासंबंधी महत्त्वाचे निष्कर्ष कात्यांच्या अभ्यासाने भारतातील लेणीविषयक अभ्यासाची नवीन संशोधन पद्धती विकसित झाली.
(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे संस्कृत व भारतीय विद्या अध्ययन केंद्राच्या विभागप्रमुख आहेत.)

























































