भाजपने आजपर्यंत कोणत्याही महिलेला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर संधी दिलेली नाही, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी लोकसभेतील घडामोडींवर प्रतिक्रिया देताना केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केली. विरोधी पक्षांनी एकत्र येत सरकारचा डाव उधळून लावला असून हा लोकशाहीचा विजय असल्याचे त्यांनी म्हटले.

पत्रकारांशी बोलताना रेड्डी म्हणाले की, संसदेत विरोधकांनी एकजुटीने उभे राहत सत्ताधाऱ्यांचा खरा हेतू देशासमोर आणला. “आता भाजप आमच्यावर महिला आरक्षणाच्या विरोधाचा आरोप करत आहे, पण प्रत्यक्षात 2023 मध्ये मंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकाला आम्हीच पाठिंबा दिला होता,” असे त्यांनी स्पष्ट केले.

रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून म्हटले की, “जर महिलांसाठी खरोखर काही करायचे असेल, तर स्पष्ट आणि योग्य कायदे आणावेत. केवळ राजकीय फायद्यासाठी महिलांच्या प्रश्नाचा वापर करू नये.”

काँग्रेसच्या भूमिकेचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, देशात महिलांना सर्वोच्च पदांवर पोहोचवण्याचे काम काँग्रेसनेच केले आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री आणि राज्यपाल अशा अनेक पदांवर महिलांना संधी देण्याबरोबरच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात पंचायती राज व्यवस्थेत महिलांना आरक्षण देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता.

याउलट भाजपने आजपर्यंत कोणत्याही महिलेला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर संधी दिलेली नाही, असा आरोपही त्यांनी केला. “महिलांविषयीचा दृष्टिकोन केवळ बोलण्यात नाही, तर कृतीत दिसायला हवा,” असेही ते म्हणाले.