
पाडव्याच्या सणाला सर्वसामान्यांना आंब्याची गोडी चाखता आली नसली तरी आता अक्षय्य तृतीयेला मात्र आमरस पुरीवर मनसोक्त ताव मारता येणार आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये अक्षय्य तृतीयेसाठी आंब्याच्या 94 हजार पेट्यांची आज आवक झाली. त्यामध्ये कोकणातील हापूसच्या सुमारे 59 हजार पेट्यांचा समावेश आहे. आवक वाढल्यामुळे आंब्याचे दर 1 हजार 500 ते 4 हजार रुपये पेटीदरम्यान आले आहेत. फळ मार्केटमध्ये विविध गाळ्यांवर आंब्यांची मोठी रास लागल्याने आंबा सौख्य भरे असे चित्र एपीएमसीत दिसत आहे.
वातावरणात झालेल्या बदलाचा यंदा कोकणातील हापूसच्या बागांना मोठा फटका बसला. त्यामुळे आंब्याचा हंगाम यंदा फेब्रुवारीमध्ये सुरू झाला असला तरी एपीएमसी मार्केटमध्ये आवक फारच कमी राहिली. त्यामुळे गुढीपाडव्याला आंब्याचा गोडवा मुंबईकरांना मनसोक्त चाखता आला नाही. मात्र आता सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील हापूसची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे एपीएमसी मार्केटमध्ये येणाऱ्या पेट्यांची संख्याही वाढली आहे. उद्या अक्षय्य तृतीया आहे. या सणासाठी कोकणातून सुमारे 59 हजार पेट्या आज मार्केटमध्ये आल्या.
अक्षय्य तृतीयामुळे आज मार्केटमध्ये किरकोळ ग्राहकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे हापूससह परराज्यातील आंबाही हातोहात विकला गेला. परराज्यातील आंब्याला किलोच्या मागे 80 रुपये दर मिळाला.
गेल्या वर्षी अक्षय्य तृतीयेला मार्केटमध्ये आंब्याच्या एक लाख पेट्यांची आवक झाली होती. त्यामध्ये कोकणातील हापूसच्या सुमारे 70 हजार पेट्यांचा समावेश होता. त्या तुलनेत कोकणातील हापूसची आवक यंदा कमी झाली आहे.
10 मेपर्यंत आवक चांगली राहणार
वातावरणातील बदलाचा कोकणातील हापूसच्या बागांना यंदा मोठा फटका बसला. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या मोहरचे फळ अपेक्षेप्रमाणे मार्केटमध्ये आले नाही. आता संपूर्ण कोकणातील हापूस आंब्याची आवक एपीएमसी मार्केटमध्ये सुरू झाली आहे. ही आवक येत्या १० मेपर्यंत अशीच राहणार आहे. त्यानंतर कोकणातील हापूसची आवक कमी होऊन परराज्यातील आंब्याची आवक वाढणार आहे, अशी प्रतिक्रिया एपीएमसीचे संचालक संजय पानसरे यांनी व्यक्त केली आहे.
























































