‘जर त्यांनी थोडीही चूक केली, तर…’, वाटाघाटीआधी इराण सतर्क; अमेरिकेला दिला कडक शब्दात इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण आणि अमेरिकेतील चर्चेची दुसरी फेरी पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे होणार आहे. एकीकडे याची तयारी सुरू असताना दुसरीकडे इराण सतर्क आहे. इराण मुत्सद्देगिरीसाठी तयार असला तरी लष्करीदृष्ट्या पूर्णपणे सतर्क आहे, असे विधान करत इराणच्या संसदेचे सभापती मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी अमेरिकेला कडक शब्दांमध्ये इशारा दिला आहे.

दीड महिन्यांच्या संघर्षानंतर इराण आणि अमेरिकेमध्ये 14 दिवसांचा युद्धविराम झाला. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये इस्लामाबाद येथे झालेली चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरली. आता दुसऱ्या फेरीची तयारी सुरू असून तत्पूर्वी दोन्ही बाजूने शा‍ब्दिक युद्ध सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझची सामुद्रधुनी व्यापारासाठी खुली असल्याचे आणि इराण समुद्ध युरेनियम आमच्याकडे सोपवण्यास तयार असल्याचे म्हटले. तर इराणने युरेनियम परकीय देशाकडे सोपवण्यास नकार दिला. तसेच होर्मुझच्या सामुद्रधुनी पार पडणाऱ्या जहाजांवर गोळीबारही केला. त्यामुळे पुन्हा तणाव वाढू लागला. याच दरम्यान इराणच्या संसदेचे सभापती मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी अमेरिकेला इशारा दिला.

एका दूरचित्रवाणी भाषणात ते म्हणाले की, इराणने युद्धभूमीवर वर्चस्व गाजवले असून आता आम्ही भक्कम स्थितीतून वाटाघाटी करण्यास तयार आहोत. मात्र, जर शत्रूने थोडी जरी चूक केली, तर आम्ही पूर्ण ताकदीनिशी त्याला चोख प्रत्युत्तर देऊ. यावेळी गालिफ यांनी अमेरिकेचे वर्चस्व मान्य केले, पण इराणची रणनीती सरस ठरल्याचे म्हटले.

होर्मुझमध्ये इराणचा हिंदुस्थानी जहाजांवर गोळीबार; एक निसटले, 13 जहाजांची माघार

आम्ही लष्करीदृष्ट्या अमेरिकेपेक्षा शक्तिशाली नाही. त्यांच्याकडे अधिक पैसा, आधुनिक उपकरणे आणि जगभरातील आक्रमणांचा अनुभव आहे, हे उघड आहे. परंतु, इराणने असिमेट्रिक वॉर म्हणजेच विषम युद्धात आपल्या अचूक नियोजनाच्या जोरावर शत्रूला मागे हटवले आहे. शत्रूकडे संसाधने असूनही त्यांच्याकडे योग्य रणनीतीचा अभाव आहे आणि ते इराणच्या लोकांचा अंदाज घेण्यात वारंवार चुका करत आहेत, असा दावाही गालिबाफ यांनी केला.

दरम्यान, गालिबाफ यांनी इस्रायलचा उल्लेख अमेरिकेचा एजंट असा केला. अमेरिका ‘अमेरिका फर्स्ट’चा नारा देते, मात्र प्रत्यक्षात ते इस्रायलला प्राधान्य देतात. इस्रायलकडून मिळणाऱ्या चुकीच्या माहितीच्या आधारे अमेरिका आपले निर्णय घेत आहे, अशी टीका गालिबाफ यांनी केली. तसेच शत्रू राष्ट्रांनी इराणची अवस्था व्हेनेझुएलासारखी करून सत्तापालट करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून इराणच्या तेलाचा लिलाव करता येईल. मात्र, इराणने हा प्रयत्न हाणून पाडला असून शत्रू आपल्या उद्देशात अपयशी ठरला आहे, असे त्यांनी म्हटले. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.