पश्चिम बंगाल निवडणुकीपूर्वी मतदार यादीत ७ लाख नवीन मतदारांची भर, निवडणूक आयोगाने केले जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू असताना, निवडणूक आयोगाने एक मोठी माहिती जाहीर केली आहे. राज्य विधानसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालच्या मतदार यादीत जवळपास ७ लाख नवीन मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने अद्याप या अतिरिक्त मतदारांचे वय किंवा लिंग याबद्दल माहिती दिलेली नाही.

पश्चिम बंगालमध्ये २३ आणि २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, बंगालच्या अंतिम मतदार यादीत अंदाजे ७ लाख नवीन मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले की, या नवीन मतदारांपैकी सुमारे ३.२२ लाख मतदार पहिल्या टप्प्यात (२३ एप्रिल) तर उर्वरित सुमारे ३.८८ लाख मतदार दुसऱ्या टप्प्यात (२९ एप्रिल) आपला मतदानाचा हक्क बजावतील.

निवडणूक आयोगाने या ७ लाख नवीन मतदारांची एकूण संख्या जाहीर केली आहे. परंतु या मतदारांच्या माहितीचा कोणताही तपशील मात्र देण्यात आलेला नाही. तसेच या मतदारांपैकी किती महिला आणि किती पुरुष आहेत, हे आयोगाने अद्याप उघड केलेले नाही.

आज तक ने दिलेल्या माहितीनुसार, मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आत प्रवेश देण्यात येणार नसल्याचे समजते. तसेच पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, निवडणूक आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, नियमांनुसार एकूण आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे, परंतु वय ​​आणि लिंगाची सविस्तर माहिती सध्या वेगळी ठेवण्यात आली असून ती नंतर दिली जाऊ शकते. फॉर्म-६ अंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जांबाबतही प्रशासन अस्पष्ट आहे. किती अर्ज प्राप्त झाले आणि त्यापैकी किती स्वीकारण्यात आले किंवा नाकारण्यात आले, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. शिवाय, असे संकेत देण्यात आले आहेत की, जर न्यायाधिकरणाने कोणताही आदेश जारी केला, तर मतदारांच्या एकूण संख्येत आणखी बदल होऊ शकतो.