
मुंबई उपनगरी रेल्वेतील मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. ठाणे ते डोंबिवली दरम्यान स्थानकांवरील प्लॅटफॉर्म वाढीच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात आल्याने, लोकल रेल्वेसेवेचा खोळंबा झाला आहे.
या ब्लॉकदरम्यान कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर गाड्या थांबत नसल्यामुळे, प्रवाशांना पर्याय नसल्याने थेट रेल्वे रुळांवरून चालत आपल्या गंतव्यस्थानी जाण्याचा धोका पत्करावा लागला. याचे काही व्हिडिओ आणि दृश्ये समोर आली असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
मध्य रेल्वेने ठाणे–डोंबिवली विभागात अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर 18 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून ते 19 एप्रिल सकाळी 10 वाजेपर्यंत विशेष पॉवर ब्लॉक जाहीर केला होता. या कालावधीत कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर लोकल गाड्यांना थांबा नसल्याने या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसला.
या मेगा ब्लॉकमुळे सकाळच्या गर्दीच्या वेळेत अनेक प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला असून, पर्यायी प्रवास व्यवस्था अपुरी पडल्याचे चित्र दिसून आले. रेल्वे प्रशासनाने काम पूर्ण करण्यासाठी हा ब्लॉक आवश्यक असल्याचे सांगितले असले, तरी प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
























































