कोस्टल रोडला मुंबईकरांची वाढती पसंती!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाविकास आघाडी सरकारच्या काळात वेगाने पुढे गेलेल्या कोस्टल रोडचा प्रकल्प वेगवान वाहतुकीच्या दृष्टीने मुंबईकरांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला आहे. 2024 मध्ये खुला केलेल्या कोस्टल रोडवर दोन वर्षांत वाहनांच्या संख्येत तब्बल सातपटीने वाढ झाली आहे. सुरुवातीला या मार्गावर दररोज सरासरी 8,787 वाहने धावत होती. सध्या ती संख्या 63 हजारांच्या पुढे गेली आहे.

मार्च 2024 मध्ये कोस्टल रोड वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मुंबईकरांच्या वेगवान प्रवासासाठी कोस्टल रोड अत्यंत उपयुक्त ठरल्याचे स्पष्ट होत आहे. मागील दोन वर्षांच्या कालावधीत या मार्गावरून एकूण 3.16 कोटी वाहनांनी प्रवास केला.

कोस्टल रोडला ‘धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी मुंबई कोस्टल रोड’ असे अधिकृत नाव देण्यात आले. 13,893 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या वेगवान कोस्टल रोडमुळे मरीन ड्राइव्ह आणि वरळी यांमधील प्रवासाचा वेळ पूर्वीच्या 30-40 मिनिटांवरून 10 मिनिटांपेक्षाही कमी झाला आहे.

कोस्टल रोड वाहतुकीला खुला केल्यानंतर सुरुवातीच्या पहिल्या महिन्यात, मार्च 2024 मध्ये तुलनेने कमी वाहनांची वर्दळ झाली होती. त्या महिनाभरात 2.63 लाख वाहनांची नोंद झाली होती. दैनंदिन सरासरी 8,787 वाहने इतकी होती. पुढील काळात वाहनसंख्येत झपाट्याने वाढ झाली. एप्रिल 2024 मध्ये मासिक वाहनसंख्या 4.36 लाखांवर गेली. नंतर दोन वर्षांत तब्बल सातपटीने वाहतूक वाढली. मार्च 2026 पर्यंत दैनंदिन सरासरी 63,003 वाहनांपर्यंत पोहोचली आणि मासिक वाहनांची संख्या 18.9 लाखांच्या घरात गेली आहे.