रहिवाशांना धमकावणाऱ्या अधिकाऱ्याची उचलबांगडी करा! मोतीलाल नगरवासीयांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोतीलाल नगरवासीयांना धमकावणाऱ्या म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याविरोधात स्थानिकांकडून आज जोरदार निदर्शने करण्यात आली. ‘‘आम्ही घुसखोर नाही… आम्ही मोतीलाल नगरचे मूळ रहिवासी आहोत,’’ अशा आशयाचे पोस्टर या वेळी रहिवाशांनी झळकवले. जयस्वाल यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याची दखल घेत त्यांची तातडीने बदली करण्याची मागणी रहिवाशांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मोतीलाल नगरचा पुनर्विकास मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पारदर्शीपणे आणि रहिवाशांना विश्वासात घेऊन व्हायला हवा. सनदी अधिकारीच काय, कुठलाही सरकारी अधिकारी हा जनतेचा सेवक असतो. म्हाडा उपाध्यक्षांनी मोतीलाल नगरवासीयांच्या मागण्या व अडचणी समजून घेत त्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. मात्र म्हाडा उपाध्यक्षांनी रहिवाशांसोबत दादागिरीची भाषा करणे अत्यंत चुकीचे आहे. या आक्षेपार्ह वक्तव्याची दखल घेत त्यांच्याविरोधात कारवाई करून तातडीने बदली करावी, अशी मागणी मोतीलाल नगर विकास समितीचे सचिव नीलेश प्रभू यांनी केली.

रहिवाशांची माफी मागा!

प्रत्येकाने मर्यादेचे भान राखले पाहिजे. मुंबईत, महाराष्ट्रात मराठीबाबत कुणाचीही अशी भूमिका असणं योग्य नाही. संजीव जयस्वाल यांनी मालक असल्याच्या आविर्भावात बोलू नये असं माझं मत आहे. त्यांनी तेथील रहिवाशांची माफी मागितली पाहिजे, अशी प्रतिक्रिया स्वयं-समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिली.