
आधुनिकीकरणाबरोबरच नागरिकांना तत्पर सेवा देण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने आता राज्यातील 100 तालुक्यांमध्ये 28 दिवसांत मोजणी अर्ज निकाली काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे नागरिकांची कागदपत्रे योग्य असतील किंवा कोणताही वाद नसेल तर सवा महिन्यात जमिनीची मोजणी करून मिळणार आहे.
भूमी अभिलेख विभागाने पाच विभागांत या मोहिमेला सुरुवात केली आहे. सध्या राज्यात मोजणी अर्ज केल्यानंतर मोजणीची तारीख मिळण्यास किमान तीन ते सहा महिन्यांचा कालावधी लागतो. अपुरे मनुष्यबळ व अन्य कारणांमुळे अनेक मोजणी अर्ज प्रलंबित आहेत. प्रलंबित मोजणीचे अर्ज निकाली काढण्याबरोबरच नवीन कमीत कमी कालावधीत नागरिकांना जमिनीची मोजणी करून देण्यासाठी मध्यंतरी भूमी अभिलेख विभागाने खासगी एजन्सीची नेमणूक करून भूमापकांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्यात आतापर्यंत 200 हून अधिक, तर येत्या काही दिवसांत नव्याने काही भूमापकांची नेमणूक करण्यात येणार आहे. जेणेकरून जमीन मोजणी प्रक्रिया तत्काळ मार्गी लागण्यास मदत होईल. दस्तनोंदणीच्या वेळी मोजणी नकाशे जोडणे बंधनकारक करण्याचा निर्णय यापुढील काळात राज्य शासनाकडून घेण्यात येणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणूनही या मोहिमेकडे पाहिले जात आहे.





























































