
‘नीट’ पेपरफुटी प्रकरणानंतर आता परीक्षा व्यवस्थेत मोठे बदल होणार आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) अशी नवीन प्रणाली तयार करण्यावर काम करत आहे, ज्यामध्ये प्रश्न तयार करणाऱ्या तज्ञांनाही ते कोणत्या परीक्षेचे प्रश्नपत्रिका बनवत आहेत हे कळणार नाही.
पुढील वर्षाच्या परीक्षेसाठी सरकारच्या पातळीवर सध्या या प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. या प्रस्तावानुसार, प्रश्न तयार करण्यासाठी आमंत्रित केलेल्या विषय तज्ञांना त्यांचे प्रश्न नीट, जेईई किंवा एनटीएद्वारे घेतल्या जाणाऱ्या इतर कोणत्या परीक्षेसाठी वापरले जाणार आहेत, हे माहीत नसेल. त्याऐवजी, त्यांनी तयार केलेले प्रश्न एका मोठ्या केंद्रीय संग्रहात (सेंट्रल रिपॉझिटरी) समाविष्ट केले जातील, ज्यामधून नंतर प्रश्नपत्रिका तयार केल्या जातील. यामुळे अंतिम प्रश्नपत्रिकेची माहिती असणाऱ्या व्यक्तींची संख्या लक्षणीयरीत्या कमी होईल. नीट-यूजी 2026 लीकप्रकरणी सीबीआयने केलेल्या तपासानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या मते, यात सुमारे 10 हजार प्रश्न असू शकतात. नंतर तंत्रज्ञानाच्या मदतीने या प्रश्नांमधून अंतिम परीक्षेची प्रश्नपत्रिका तयार केली जाईल.
झीरो ट्रस्ट पॅटर्न राबवणार
‘आम्ही मानवी हस्तक्षेप कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी ‘झीरो-ट्रस्ट आर्किटेक्चर’ असणे आवश्यक आहे. प्रस्तावित मॉडेलमुळे विषय तज्ञांची भूमिका पूर्णपणे बदलेल. एखाद्या विशिष्ट परीक्षेसाठी प्रश्न तयार करण्यासाठी आमंत्रित करण्याऐवजी, तज्ञ एका सामायिक प्रश्नपेढीत आपले योगदान देतील, परंतु हे प्रश्न शेवटी कुठे वापरले जातील, हे त्यांना सांगितले जाणार नाही, असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.
भाषांतर प्रक्रिया चौकशीच्या फेऱ्यात
तपासात आतापर्यंत प्रश्नपत्रिकेचे विविध भाग लीक केल्याच्या आरोपावरून अनुवादक आणि विषय तज्ञांसह 13 जणांना अटक करण्यात आली आहे. अटकेच्या स्वरूपावरून असे दिसून येते की, अत्यंत गोपनीय अशा ‘प्रश्नपत्रिका निर्मिती आणि भाषांतर’ या पहिल्या टप्प्यातच हा पेपर लीक झाला आहे. भाषांतर प्रक्रिया चौकशीच्या फेऱ्यात आली असून यामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
एनटीएने यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे की, ती सुमारे 85 टक्के भाषांतराचे काम एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) द्वारे करण्याची योजना आखत आहे. यानंतर, तज्ञ फक्त हे तपासतील की भाषांतर योग्य झाले आहे की नाही. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, भाषांतर करणाऱ्यांना ते कोणत्या परीक्षेचे प्रश्न पाहत आहेत याची माहिती नसावी, असाही प्रयत्न केला जाईल.
त्याचबरोबर, एनटीए सध्या 21 जून रोजी होणाऱ्या परीक्षेची तयारी करत आहे. अधिकाऱ्यांच्या मते, काही बदल आतापासूनच लागू करण्यात आले आहेत. याअंतर्गत नवीन विषय तज्ञांना जोडण्यात आले आहे. त्याचबरोबर, पेपर छापल्यानंतर त्याच्या वाहतूक आणि साठवणूक प्रणालीला अधिक सुरक्षित बनवण्यावरही काम सुरू आहे.

























































